पुणे :भांडे व्यापाऱ्याच्या दुकानातून पाच लाखांची रोकड लंपास; रविवार पेठेतील घटना

रविवार पेठेतील भांडे व्यापाऱ्याच्या दुकानातून पाच लाख रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आली. भांडे व्यापाऱ्याकडे काम करत असलेल्या कामगार आणि साथीदाराने रोकड लांबविल्याचा संशय व्यापाऱ्याने फिर्यादीत व्यक्त केला आहे.

भांडे व्यापारी खेमचंद रिखबचंद पालेशा (वय ६८, रा. गुलटेकडी) यांनी या संदर्भात खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कामगार शाम सरोज (मूळ रा. देवरपट्टी, जि. प्रतापगड, उत्तरप्रदेश) याच्यासह साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालेशा यांचे रविवार पेठेतील भांडे बाजारात दुकान आहे. त्यांच्याकडे आरोपी सरोज कामाला होता. पालेशा यांनी रात्री दुकान बंद केले. त्यानंतर दुकानाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या खिडकीतून सरोज आणि साथीदाराने प्रवेश केला. तिजोरीतून सरोज आणि साथीदाराने पाच लाखांची रोकड लांबविल्याचे पालेशा यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

पालेशा यांनी दुकान उघडल्यानंतर तिजोरी तसेच लाकडी कपाटातील रोकड चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून सहायक निरीक्षक राकेश जाधव तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply