Erandol Accident : शिर्डीवरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात; महिलेचा मृत्यू, पतीसह तीन मुले गंभीर

Erandol (Jalgaon) : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील परिवार शिर्डी येथे साईबाबा दर्शनासाठी गेला होता. दर्शन घेऊन परतताना त्यांच्या कारला एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठाजवळ कंटेनरने जोरदार धडक दिली. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर पतीसह तीन मुले गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील आश्रम शाळेचे मुख्याध्यापक राजेश वासुदेव पाटील हे सुटी असल्याने पत्नी रूपाली पाटील (वय ४०) आणि तीन मुलांसह कारने शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. दरम्यान शिर्डी येथून दर्शन घेतल्यानंतर ते रात्रीच परतीच्या प्रवासाला निघाले होते. यातच सोमवारी रात्री एकच्या सुमारास मुक्ताईनगरला जात असताना, पिंपळकोठा गावाजवळ त्यांच्या कारला मागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली.

कंटेनरच्या धडकेत कार दुभाजकावर धडकली

भरधाव कंटेनरने मागून जोरदार धडक दिल्याने कार दुभाजकावर जाऊन धडकली. या अपघातात कारमधील रूपाली पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर राजेश पाटील यांच्यासह मुलगी खुशी, स्वरा आणि गुरू हे गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी व परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालय व खासगी दवाखान्यात दाखल केले.

रुग्णालयात उपचार सुरु

दरम्यान तिन्ही गंभीर जखमी मुलांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत राजेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एरंडोल पोलिसांत कंटेनरचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार काशीनाथ पाटील तपास करीत आहेत. दरम्यान रात्रीच्यावेळी झालेल्या अपघातामुळे महामार्गावर काहीवेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply