Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात फेरीवाल्यांची दहशत; नागरिकांना सर्रास होतेय मारहाण

Eknath Shinde :  फेरीवाल्यांची दादागिरी ही कल्याण डोंबिवलीकरांसाठी काही नविन राहीलेली नाही. मात्र ही दादागिरी आता एवढी वाढली आहे की नागरिकांना मारहाण करत गंभीर जखमी करण्यासही हे फेरिवाले मागे पुढे पहात नाहीत.

पालिका कर्मचारी तसेच नागरिकांना फेरिवाल्यांनी मारहाण केल्याच्या चार ते पाच घटना आत्तापर्यंत घडल्या आहेत. फेरिवाल्यांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होऊन देखील त्यांना त्याचे भय राहीलेले नाही. आपली दहशत फेरिवाले कायम ठेवून असल्याचेच नुकत्याच घडलेल्या आयटी इंजिनिअर मारहाणी प्रकरणावरुन ही बाब स्पष्ट होत आहे.

Pune News : पुण्यातील येरवडा पुन्हा एकदा हादरलं, भर दिवसा करण्यात आला कैद्याचा खून

कल्याण डोंबिवलीतील स्टेशन परिसर, मुख्य रस्ते, पदपथ हे फेरीवाल्यांनी काबीज केले असून नागरिकांना चालण्यासाठी देखील जागा उरत नाही. डोंबिवली स्टेशन बाहेरील परिसरात इंदिरा चौक, कामथ मेडिकल पदपथ, उर्सेकरवाडी, मधुबन टॉकीज गल्ली ही आपल्या मालकीची आहे अशा अविर्भावात ठराविक फेरीवाले हे या भागात वावरत आहेत.

या जागेचे आम्ही भाडे देतो असे उघड सांगत दहशतीचा अवलंब करुन व्यवसाय करतात. अनधिकृत फेरिवाले, फुटपाथ, रस्ते काबीज करणारे फेरिवाले यांच्याविरोधात महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत असली तरी ही कारवाई केवळ दिखावेगिरी असते. ठराविक पावती फाडली की फेरीवाल्यांना त्यांचे सामान परत मिळते. पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांशी फेरिवाल्यांचे लागेबंध निर्माण झाले आहेत. त्यांना ठराविक रक्कम दिली की ते तुमच्या सामानाला हात देखील लावत नाहीत.

कारवाई करुन सामान घेऊन गेले तरी नंतर राजकीय बड्या पदाधिकाऱ्यांच्या एका फोनवर हे सामान त्यांना परत केले जाते. दिवाळीमध्ये याचा सर्वाधिक प्रत्यय आला. रस्त्यांवर फटाके विक्री करण्यास मनाई असताना देखील फेरीवाल्यांनी स्टॉलवर राजकीय बडे नेते, पदाधिकाऱ्यांचे फोटो लावून बिनधास्त आपला व्यवसाय केल्याचे दिसून आले. केडीएमसीत नवनिर्वाचित आयुक्त आले की ते फेरिवाले हटविण्याचे आदेश काढतात, त्यानुसार अतिक्रमण विभाग तात्पुरती कारवाई करते. शहरात राजकीय नेत्यांच्या सभा, दौरे, आयुक्त, प्रभाग अधिकारी यांचा दौरा असल्यास या परिसरातील फेरिवाले त्या त्या वेळेपुरते हटल्याचे आढळून येते. परंतू हे दौरे, सभा पार पडताच पुन्हा फेरिवाले आपला परिसर काबीज करत आहेत.

फेरीवाल्यांची दहशत एवढी का वाढली ? त्यांना कोणी खतपाणी दिले हा मुख्य मुद्दा आहे. यावर आता फेरिवाल्यांनीच बोलण्यास सुरुवात केली आहे. फेरिवाल्यांकडून स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षातील पदाधिकारी, पालिका कर्मचारी, अधिकारी यांना ठराविक हप्ते जातात. स्टेशन परिसरातील दुकानदार आपल्याच दुकानातील माल या फेरिवाल्यांना विक्रीसाठी देत दुकानासमोर जागा ही उपलब्ध करुन देतात. यामध्ये बाहेरुन आलेल्या विक्रेत्यांची संख्या अधिक असून त्यांची मुजोरी वाढत आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply