Eknath Shinde : सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाची मागणी फेटाळली; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया,

CM Eknath Shinde Reaction On Supreme Court Decision : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील एका मुद्द्यावर सुप्रीम कोर्टानं आज निकाल दिला आहे. यामध्ये आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात तसेच नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी ७ सदस्यीय खंडपीठाकडं या प्रकरणाची सुनावणी व्हावी, ही ठाकरे गटाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. त्यामुळं तुर्तास हे प्रकरण आता ७ सदस्यीय खंडपीठासमोर जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या गटाला बसलेला हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने आज दिलेल्या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आमचा कोर्टावर पूर्ण विश्वास आहे. न्यायव्यवस्थेने याबाबतचा निर्णय मेरीटवर घ्यावा, असं शिंदेंनी म्हटलं आहे.

लोकशाहीत बहुमताला खूप महत्व आहे. काही नियम असतात, नियमानुसार आमचे सरकार स्थापन झाले आहे. काही लोकांना वेळकाढूपणा हवा आहे. म्हणून ते सत्तासंघर्षाचं प्रकरण मोठ्या बेंचकडे पाठवण्याची मागणी करत आहेत. प्रकरण ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडं गेलं तर त्यात खूप वेळ जाईल, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आमचं सरकार हे बहुमताचं सरकार आहे. कायद्याद्वारे स्थापित झालेलं सरकार आहे. सगळे नियम पाळून हे सरकार स्थापन झालं आहे. लोकशाहीमध्ये घटना आहे. कायदे आहे, नियम आहे. बहुमताचं सरकार या राज्यात काम करतंय. त्यामुळे मेरीटवर हा निर्णय घ्यावा, अशी मागणी देखील एकनाथ शिंदे केली आहे.

सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?

राज्यात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षावर गेले तीन दिवस सुप्रीम कोर्टात सुरू असलेला युक्तिवाद गुरुवारी पूर्ण झाला होता. मात्र, सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने या प्रकरणावरील निकाल राखून ठेवला होता. आज या निकालाचे वाचन करण्यात आले.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एक पानी निकालाचे वाचन केले. यामध्ये नबाम रेबीया प्रकरणाच्या गुणवत्तेवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर नबाम रेबियाचे प्रकरण हे तुर्तास ७ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हे प्रकरण ५ न्यामूर्तींच्या खंडपीठकडे राहणार असून या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला होणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply