Dhule : संकटांशी झुंजणाऱ्या पतीला पत्नीचे जीवदान, अर्धांगिनीचा आदर्श पाहून तुम्हीही म्हणाल बायको असावी तर अशी...

Dhule : धुळे तालुक्यातील बिलाडी येथील सौ. शोभाताई संजीव मोरे यांनी आपली स्वतःची किडनी देत पतीला जीवदान देऊन समाजात आदर्श निर्माण केला आहे. शोभाताईंच्या या कार्याचे समाजातून जोरदार कौतुक होत आहे.

शोभाताई यांच्यामुळे पती संजीव मोरे हे ठणठणीत झाले आहेत. बिलाडी येथील वॉटर योग साधक, श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा उद्योजक संजीव विठ्ठल मोरे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची दोन वर्षांपूर्वीच बायपास सर्जरी झाली आहे. शिवाय निमोनिया, कावीळ, टिबी, फंगल इन्फेक्शन, हार्निया आदी आजारांनाही ते तोंड देत आले आहेत. त्यानंतर त्यांच्या शरीरात पाणी झाल्याने त्यांना किडनीचा त्रास सुरु झाला.

किडनी दात्याचा शोध

त्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेतला असता किडनी ट्रान्सप्लांट करावी लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. संजीव मोरे यांना किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याने किडनी कोण देणार? यांची चिंता सुरु झाली. संजीव मोरे यांच्या बंधूसह नातेवाईकांनी किडनी डोनरचा शोध सुरु केला; पण त्यात अपयश आले.

बायकोचा मोठा निर्णय

त्यामुळे संजीव मोरे यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी सौ. शोभाताई संजीव मोरे यांनी किडनी देण्याचे धारिष्ट्य दाखवले. त्यानुसार ५ जून २०२४ रोजी संजीव मोरे यांची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली. त्यानंतर ६ ऑगस्ट २०२४ रोजी डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून संजीव मोरे हे मृत्यूशी झुंज देत होते, त्यातून ते सहीसलामत बाहेर आले. याचे श्रेय सर्वस्वी त्यांच्या अर्धांगिनी सौ. शोभाताई संजीव मोरे यांनाच द्यावे लागेल.

समाजात पती-पत्नी मधील अतूट नाते कसे असते, याचा प्रत्यय संजीव मोरे यांच्या बाबतीत आला. पती संजीव मोरे यांना आपली एक किडनी देत सौ. शोभाताई यांनी समाजासमोर मोठा आदर्श उभा केला आहे. त्यांच्या या धाडसाचे व समर्पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. संजीव मोरे हे बिलाडी गावातील प्रगतशील शेतकरी कै. विठ्ठल नथ्थू पाटील मोरे यांचे चिरंजीव तर नगांव एज्युकेशन सोसायटी संचलित संस्थेतून सेवानिवृत्त झालेले कैलास विठ्ठल मोरे यांचे बंधू आहेत.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply