Dhananjay Munde : करुणा शर्मांना देखभाल खर्च देण्याचे धनंजय मुंडेंना आदेश, कोर्टात काय-काय झालं?

Dhananjay Munde  : मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांना वांद्रेच्या कौटुंबिक न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. करूणा शर्मा आणि मुलांना देखभाल खर्च देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. कौटुंबिक न्यायालयानं आदेश देताना नेमकं काय म्हटलं आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

दरमहिन्याला २ लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने धनंजय मुंडे यांना दिले आहेत. करुणा यांचे वकील गणेश कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'करुणा यांना महिन्याला १ लाख २५ हजार आणि मुलगी शिवानीला तिच्या लग्नापर्यंत महिन्याला ७५ हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.'

करुणा यांनी न्यायालयामध्ये केलेल्या याचिकेमध्ये असे म्हटले आहे की, 'धनंजय मुंडे आणि त्यांचे ९ जानेवारी १९९८ रोजी लग्न झाले होते. आधी ते इंदूरमध्ये राहत होते, नंतर ते मुंबईत राहू लागले. २०१८ पर्यंत त्यांचे वैवाहिक जीवन व्यवस्थित सुरू होते. पण २०१८ नंतर धनंजय मुंडे यांच्या वागण्यात बदल झाले. आमदार झाल्यानंतर ते मुंबईतच राहू लागले. त्यानंतर त्यांनी राजश्री यांच्यासोबत दुसरे लग्न केले.'

करुणा यांनी याचिकेमध्ये पुढे असेही म्हटले आहे की, 'समाजात प्रतिष्ठा राखण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांच्या दबावाखाली त्यांनी राजश्री यांच्याशी दुसरे लग्न केले होते असे मला सांगितले. त्यांनी मला असेही आश्वासन दिले होते की, ते नेहमीच मला पहिल्या पत्नीचा दर्जा देतील. म्हणून धनंजय मुंडे यांच्या प्रतिष्ठित दर्जामुळे मी कधीही त्यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल तक्रार केली नव्हती.'

कोर्टाने आदेशात नेमकं काय-काय म्हटलंय?

- धनंजय मुंडेंवर करुणा मुंडेंनी केलेले आरोप अंशत: मान्य केले आहेत.

- या प्रकरणाचा शेवटचा निकाल येईपर्यंत धनंजय मुंडे यांनी घरगुती हिंसाचार करू नये

- धनंजय मुंडेंनी करुणा शर्मा यांना दरमहा २ लाखांचा देखभाल खर्च द्यावा.

- या खटल्याचा खर्च २५ हजार रुपये असून तो धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना द्यावा.

धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी काय सांगितले?

- कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम पोटगीचा आहे

- धनंजय मुंडे यांनी काही चुकीचं केलंय असे कोर्टाला आढळले नाही.

- धनंजय मुंडे दोषी असल्याचे कोर्टाने कुठेही म्हटले नाही

- करुणा शर्मासोबत लिव्ह ईनमध्ये राहत होतो हे धनंजय मुंडे यांनी आधीच मान्य केले आहे. हे ग्राह्य धरूनच कोर्टाने आजचे आदेश दिले आहेत.

- धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचं कोर्टाने मान्य केले असल्याचं करुणायांचं म्हणणं आहे. पण हा दावा धनंजय मुंडेंच्या वकिलांनी फेटाळला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply