CM Eknath Shinde : ‘रोजचा एक मिनिट स्वच्छतेसाठी द्या’, राज्यपालांनी दिली समुद्र रक्षण करण्याची शपथ

CM Eknath Shinde - भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या ‘जी २०’ देशांच्या परिषदेचा एक भाग म्हणून आज जुहू चौपाटीवर सागरी किनारा स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनातील एक मिनिट स्वच्छतेसाठी द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी केले.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरण बदल मंत्रालयाच्या पुढाकाराने आयोजित या मोहिमेवेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे हेदेखील उपस्थित होते. या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘आपले प्रत्येक कार्य पर्यावरणपूरक असले पाहिजे. समुद्र स्वच्छता कार्यात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. पर्यावरणाचे संतुलन आणि ग्लोबल वार्मिंगकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी आपापली कामे बजावून दिवसातला एक मिनिट स्वच्छतेसाठी देणे उचित ठरेल.

राज्यपाल बैस यांनी या वेळी उपस्थितांना समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्याची तसेच प्रदूषण व कचऱ्यापासून समुद्राचे रक्षण करण्याची शपथ दिली. जी-२० देशांच्या तसेच अन्य आमंत्रित देशांच्या प्रतिनिधींनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेताना समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा घेतली.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्वच्छता मोहिमांसारख्या उपक्रमांची गरज आहे. स्वच्छतेसाठी प्रत्येकाने आपल्या जीवनातला काही वेळ दिला पाहिजे, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. ग्लोबल वॅार्मिंग आणि वातावरणातील बदलामुळे भेडसावणाऱ्या समस्यांपासून दिलासाही मिळेल.

- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply