CIDCO Lottery : सिडकोच्या घरांना नापसंती, दीड लाखांपेक्षा जास्त अर्ज; फक्त १५ हजार अर्जदारांनी भरली अनामत रक्कम

New Mumbai : सिडकोने गतवर्षी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर माझे पसंतीचे घर म्हणत तब्बल २६ हजार घरांची सोडत काढली होती. मात्र सिडकोच्या माझ्या पसंतीच्या घराला नागरिकांची नापसंती मिळत असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. सिडकोची घरे म्हणजेच नवी मुंबईमध्ये घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नातील घरं अगदी परवडणाऱ्या किंमतीमध्ये उपलब्ध होतील असा नागरिकांचा समज असतो. मात्र यंदा सिडकोने प्रत्येक नोडमधील रेडी रेकनरनुसार घरांच्या किंमती जाहीर केल्याने सिडकोच्या घरांच्या किंमती थेट खासगी विकासाकांच्या घरांच्या किंमती एवढ्या झाल्यात.

दसऱ्याला सिडकोच्या २६ हजार घरांची लॉटरी जाहीर होताच हजारो नागरिकांनी आपले अर्ज दाखल केले. आतापर्यंत १ लाख ६० हजार नागरिकांनी सिडकोचे घर घेण्यासाठी अर्ज भरले होते. मात्र सिडकोने आपल्या घरांच्या किंमती जाहीर करताच यातील केवळ १५ हजार नागरिकांनीच आतापर्यंत अनामत रक्कम भरत घर घेण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

MHADA News : खुशखबर! म्हाडाच्या ६४२० घरांसाठी आज निघणार सोडत; ऑनलाइन पद्धतीने होणार घोषणा

२५ लाखांपासून ते ९७ लाखांपर्यंत सिडकोची घरे असून अल्प उत्पन्न गट आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी ही घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. घरांच्या किंमती पाहून अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला ही घरे घेणे शक्य आहे का असा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळेच मोठया प्रमाणात जाहिरातबाजी करूनही माझ्या पसंतीच्या घराला नागरिकांनी मात्र नापसंतीच दर्शवलेली पहायला मिळत आहे.

अनामत रक्कम भरण्यासाठी आणखी ३ दिवस असून या ३ दिवसांत किती नागरिक अनामत रक्कम भरतात याकडे सिडकोचे लक्ष लागले आहे. घरांच्या अवाढव्य किंमतीमुळे सिडकोच्या घरांना अल्प प्रतिसाद मिळाला असून आता तरी सिडको आपल्या घरांच्या किंमती कमी करते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply