Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Chennai Super Kings Defeat Sunrisers Hyderabad Ruturaj Gaikwad Tushar Deshpande Shine IPL 2024 : चेन्नई चेपॉकवर अभेद्य होती. मात्र केएल राहुलच्या लखनौनं येऊन सीएसकेचा बालेकिल्ला जिंकला. लखनौच्या आक्रमणानंतर आता हैदराबादचं मोठं आव्हान ऋतुराजसमोर होतं. सीएसकेचा नवखा कर्णधाराला हैदराबादचं अवाढव्य आव्हान परतवून लावत आपला बालेकिल्ला पुन्हा जिंकायचा होता.

समोर हेड, अभिषेक शर्मा, मार्करम, क्लासेन, पॅट कमिन्स, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार यासारखे तगडे योद्धे होते. त्यात नाणेफेक गमावल्यानं सीएसकेच्या सेनेचं काम अजून अवघड झालं होतं.

मात्र मराठमोळा लढवय्या कर्णधार ऋतुराजनं आपल्या संघाचं पुढं होऊन नेतृत्व केलं. तगड्या गोलंदाजीसमोर चेन्नईला म्हणावी तशी चांगली सुरूवात मिळाली नाही. त्यात अजिंक्य रहाणे स्वस्तात बाद झाला. मात्र ऋतुराज खचला नाही. त्यानं डॅरेल मिचलला साथीला घेतलं अन् आधी पॉवर प्ले संपायच्या आत झालेलं नुकसान भरून काढलं.

CSK Vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

पॉवर प्लेनंतरही ऋतुराजनं आपली फटकेबाजी सुरू ठेवली. त्याला मिचेलनंही दमदार साथ दिली. या जोडींन तिसऱ्या विकेटसाठी 107 धावांची शतकी भागीदारी रचली. त्यानंतर दांडपट्टा स्पेशलिस्ट शिवम दुबेनं 20 चेंडूत 39 धावा करत हैदराबादला हैराण करून सोडलं. कर्णधार ऋतुराज शंभरीजवळ पोहचला होता. तो जवळपास 200 च्या स्ट्राईक रेटनं धावा करत होता.

मात्र नटराजननं मोक्याच्या क्षणी सीएसकेच्या कर्णधाराला खिंडीत पकडलं अन् अवघ्या 2 धावांनी ऋतुराजचं शतक हुकलं. जरी शतक हुकलं असलं तरी ऋतु बहरला होता अन् सीएसकेने 200 चा आकडा गाठला होता. शेवटच्या षटकात शिवम दुबेनं शेवटचा हात फिरवून घेतला अन् संघाला महत्वाच्या धावा करून दिल्या. धोनीनंही हात धुवून घेत एक चौकार पदरी पाडून घेतला.

आता सीएसकेची खरी परीक्षा सुरू झाली होती. 212 धावा करून जरी अर्धी लढाई जिंकली असली तरी आता हैदराबाद पलटावर करणार होतं. हा पलटवार परतवून लावत बालेकिल्ला वाचवणं गरजेचं होतं. ऋतुराजच्या सेनेतला तुषार देशपांडेनं ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.

आधी त्यानं हैदराबादचे अव्वल शिलेदार ट्रॅविस हेड, अमोलप्रीत अन् अभिषेक शर्माची शिकार केली. पहिल्याच आक्रमणात तीन तगडे शिलेदार गमावल्यानं हैदराबादला हाबकी भरली. हैदराबादचे मधल्या फळीतील शिलेदार एडिन मार्करम अन् नितीश रेड्डी यांनी पुन्हा चढाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र सीएसकेच्या कसलेल्या गोलंदाजांच्या माऱ्यासमोर त्यांची आगेकूच मंदावली.

रेंगाळलेल्या मार्करम आणि नितीश रेड्डीला रोखून धरल्यानंतर पथिराना अन् जडेजानं त्यांचा काटा अलगद काढला. पथिरानानं एकहाती सामन्याचा नूर पालटण्यात तरबेज असलेल्या क्लासेनचीही शिकार केली. सीएसकेच्या  या गोलंदाजांना फिल्ड प्लेसमेंटची उत्तम साथ लाभली. त्यामुळंच ओल्या मैदानावर परिस्थिती बाजूनं नसतानाही सीएसकेच्या पोरांनी हैदराबादला हैराण केलं.तुषार, पथिराना अन् जडेजाच्या या शिकारी मोहीमेत आता ठाकूर अन् मुस्तफिजूरही सामील झाले होते. त्यांनी समाद, शाहबाज अहमद यांची शिकार करत आपलाही वाटा उचलला. तुषार देशपांडेनं या शिकारी टोळीचं जबरदस्त नेतृत्व केलं. त्यानं हैदराबादच्या नेत्याला टिपला अन् हैदराबादला पराभवाच्या खाईजवळ नेऊन ठेवलं. मुस्तफिजूरनं उनाडकटची शिकार करत हैदराबादचा कडेलोट केला! सीएसकेनं आपला बालेकिल्ला पुन्हा मिळवला!

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply