Barsu Refinery Protest: बारसू आंदोलकांवर लाठिचार्ज करण्याचे आदेश कुणी दिले? उदय सामंत म्हणतात...

Barsu Refinery Protest: बारसू रिफायनरी विरोधात सुरु असलेलं स्थानिकांचं आंदोलन पाचव्या दिवशी चिघळलं आहे. आंदोलनकर्त्या नागरिकांवर पोलिसांनी लाठिचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या.

या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना रत्नागिरीचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं की, पोलिसांनी लाठिचार्ज कशासाठी केला, त्यांना कुणी आदेश दिले याची चौकशी केली जाईल. 

स्थानिक लोक आहेत, त्यांच्यावर काही कारवाई झाली असेल तर त्याबद्दल नक्की माहिती घेऊन चौकशी करु. मात्र बाहेरुन याठिकाणी लोक कशासाठी येत आहेत. स्थानिकांना समर्थन करायचं की पेटवापेटवीचं राजकारण करायचं? हे चुकीचं आहे. स्वत:च्या राजकारणाच्या पोळ्या भाजण्यासाठी जनतेचा वापर कुणी करु नये, असं आवाहन उदय सामंत यांनी केलं.

स्थानिक नागरिकांना भडकवलं जात आहे. मात्र आंदोलनकर्त्यांच्या ज्या काही शंका आहेत, त्या चर्चा करुन त्या दूर करायला सरकार तयार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील याबाबच चर्चा करायला तयार आहेत. मात्र असं नागरिकांचा वापर करुन राजकारण होत असेल तर ते चुकीचं आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं.

प्रकल्प लगेच तिथे येणार नाही. सध्या तिथे सर्वेक्षण नाही तर मातीचं परीक्षण करण्यात येत आहे. मात्र त्याआधीच लोकांची माथी भडकावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विनायक राऊत यांच्या भेटीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोपही उदय सामंत यांनी केला.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply