IPL 2024 RCB vs KKR : कोलकाताचा धडाकेबाज विजय ; विराटच्या ८३ धावांनंतरही बंगळूरचा पराभव

बंगळूर : विराट कोहलीच्या नाबाद ८३ धावांच्या खेळीनंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला शुक्रवारी आयपीएल साखळी फेरीच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. कोलकाता नाईट रायडर्सने अवघ्या १६.५ षटकांत १८३ धावांचा यशस्वी पाठलाग करताना गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. फिल सॉल्ट (३० धावा), सुनील नारायण (४७ धावा), व्यंकटेश अय्यर (५० धावा) व कर्णधार श्रेयस अय्यर (नाबाद ३९ धावा) यांची शानदार खेळी कोलकाताच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरली. संथ चेंडूवर फलंदाजी करण्यात बंगळूरचे फलंदाज अपयशी ठरले.

बंगळूरकडून कोलकातासमोर १८३ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. फिल सॉल्ट व सुनील नारायण या जोडीने ८६ धावांची भागीदारी करताना विजयाची भक्कम पायाभरणी केली. सुनील ४७ धावांवर, तर सॉल्ट ३० धावांवर बाद झाले. मात्र त्यानंतरही कोलकाता संघाच्या धावसंख्येला ब्रेक लागला नाही. व्यंकटेश अय्यर व श्रेयस अय्यर या जोडीने ७५ धावांची भागीदारी करीत कोलकात्याचा विजय निश्‍चित केला.

व्यंकटेशने ३ चौकार व ४ षटकारांसह ५० धावांची खेळी केली. श्रेयसने नाबाद ३९ धावा केल्या. दरम्यान, याआधी कोलकाता संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हर्षित राणा याने फाफ ड्युप्लेसिस याला ८ धावांवर बाद केले. त्यानंतर विराट कोहली व कॅमेरुन ग्रीन या जोडीने ६५ धावांची भागीदार रचली. आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात ग्रीनचा ३३ धावांवर त्रिफळा उडाला.

IPL मधील नियमामुळे पाँटिंग-गांगुलीचा पंचांशीही वाद, RR Vs DC सामनाही अचानक थांबला; जाणून घ्या नक्की झालं काय?

विराट व ग्लेन मॅक्सवेल ही महत्त्वाची जोडी स्थिरावणार असे वाटत असतानाच सुनील नारायण याने मॅक्सवेलला २८ धावांवर बाद करीत अडसर दूर केला. रजत पाटीदार याला आंतरराष्ट्रीय स्तरावर निराशेला सामोरे जावे लागले आहे. रसेलच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो रिंकू सिंगकरवी झेलबाद झाला.

विराट कोहलीने यंदाच्या मोसमातील दुसरे अर्धशतक साजरे केले. त्याने दिनेश कार्तिकच्या साथीने बंगळूरला २० षटकांत ६ बाद १८२ धावांपर्यंत मजल मारून दिली. विराटने ५९ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ८३ धावांची फटकेबाजी केली. कार्तिकने २० धावा केल्या. कोलकाताकडून रसेल व हर्षित यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक : बंगळूर - २० षटकांत ६ बाद १८२ धावा (विराट कोहली नाबाद ८३ - ५९ चेंडू, ४ चौकार, ४ षटकार, कॅमेरुन ग्रीन ३३, ग्लेन मॅक्सवेल २८, आंद्रे रसेल २/२९) पराभूत वि. कोलकाता नाईट रायडर्स १६.५ षटकांत ३ बाद १८६ धावा (फिल सॉल्ट ३०, सुनील नारायण ४७, व्यंकटेश अय्यर ५०, श्रेयस अय्यर नाबाद ३९).



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply