Andheri Bypoll election 2022: लटकेंचा एकतर्फी विजय; अंधेरी पोटनिवडणुकीतील निकालाने ठाकरे गटाला बळ

मुंबई : भाजपच्या माघारीनंतर एकतर्फी झालेल्या अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला. शिवसेनेतील फुटीनंतर पक्षाचे नवीन नाव, मशाल चिन्हावर विजय संपादन केल्याने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेला बळ प्राप्त झाले आहे.

भाजपच्या माघारीनंतर अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणूक एकतर्फी होईल, हे स्पष्ट होते. तरीही शिवसेनेने सारी ताकद पणाला लावली होती. मतदारांमधील निरुत्साहामुळेच अवघे ३२ टक्के मतदान झाले होते. शिवसेनेच्या ऋतुजा लटके यांना ६६,५३० मते मिळाली, तर अन्य सहा अपक्षांना दीड हजारांच्या आतच मते पडली. ‘नोटा’चा पर्याय १२,८०६ मतदारांनी स्वीकारला. लातूर ग्रामीणनंतर राज्यात अंधेरी पूर्वमध्ये ‘नोटा’चे बटण जास्त मतदारांनी पसंत केले आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या या पहिल्याच पोटनिवडणुकीत शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपने मुरजी पटेल यांची उमेदवारी जाहीर करून प्रचारही सुरू केला होता. शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह मिळू नये म्हणून एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. सर्वाधिक खासदार व आमदारांचा शिंदे यांना पाठिंबा असल्याने निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव वापरण्यास ठाकरे गटाला मज्जाव केला तसेच धनुष्यबाण चिन्ह गोठवले होते. ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव तसेच मशाल हे चिन्ह निवडणूक आयोगाने बहाल केले होते. शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ढाल- तलवार चिन्ह दिले होते.

 दरम्यान, ऋतुजा लटके यांच्या उमेदवारी अर्जाचा घोळ घालण्यात आला. त्यांचा मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतील राजीनामा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत स्वीकारण्यास महापालिका प्रशासनाने नकारघंटा वाजविली होती. या विरोधात लटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने राजीनामा स्वीकारण्याचा आदेश दिल्याने भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना गटाची पंचाईत झाली. भाजपने केलेल्या सर्वेक्षणात शिवसेनेच्या ठाकरे गटाला यश मिळेल, असेच निष्कर्ष प्राप्त झाले होते. भाजपने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली असती व पराभव झाला असता तर त्याचा फटका आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बसण्याची भीती भाजपला होती. यामुळेच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्राच्या आधारे भाजपने माघार घेत असल्याचे जाहीर करीत निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडणे पसंत केले.

महाविकास आघाडीचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादीसह डावे व अन्य समविचारी पक्ष या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले होते. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकांना एकत्रित सामोरे गेल्यास फायदा होतो, हे देगलूर, कोल्हापूर उत्तर मतदारसंघांतील पोटनिवडणूक किंवा पुणे व नागपूर पदवीधर मतदारसंघांतील निकालांवरून यापूर्वीच सिद्ध झाले होते. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुका लढल्यास ते भाजप आणि शिंदे गटासाठी मोठे आव्हान असेल.

अंधेरीच्या यशाचा फायदा किती?

पोटनिवडणुकीतील यशाने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाला बळ प्राप्त झाले आहे. फुटीनंतर पहिल्याच निवडणुकीतील यशाने पक्षासाठी योग्य संदेश गेला आहे. पराभव झाला असता तर शिवसेना संपली, असा प्रचार सुरू झाला असता. अंधेरीच्या निकालाचा महानगरपालिका निवडणुकीत थेट परिणाम होणार नसला तरी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बळ प्राप्त झाले आहे. तसेच फुटीनंतरही शिवसैनिकांना जिंकू शकतो, असा विश्वास निर्माण होण्यास मदत होणार आहे. अंधेरीच्या निकालाचा मुंबईत महापलिका निवडणुकीवर तेवढा प्रभाव पडणार नसला तरी शिवसेना व उद्धव ठाकरे यांना हा निकाल उपयुक्त ठरणारा आहे. कार्यकर्त्यांना नैतिक बळ देण्यात अंधेरीचा निकाल पक्षाला उपयोगी पडू शकतो.

‘नोटा’ दुसऱ्या क्रमांकावर

पोटनिवडणुकीत मतदारांमध्ये कमालाची निरुत्साह होता. भाजपच्या माघारीनंतर चित्रच पालटले होते. शिवसेना वगळता सहा जण रिंगणात होते. पण, त्यातील कोणीच फारसे प्रभावशाली नव्हते. ‘नोटा’चा वापर करावा, असे आवाहन केले जात असल्याचा आरोप शिवसेनेचे अनिल परब यांनी भाजपवर केला होता. लटके यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची १२,८०६ मते ‘नोटा’ला मिळाली आहेत.

निकाल

  • ऋतुजा लटके – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – ६६,५३० 
  • नोटा – १२,८०६ मते
  • अन्य सहा उमेदवारांना दीड हजारांच्या आतच मते


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply