Akola News: भाजप आमदाराला शिव्या देणं भोवलं, अकोल्यात पोलीस निरीक्षकावर मोठी कारवाई

 

Akola : अकोल्यातल्या मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांना एका पोलीस अधिकाऱ्याने फोनवर शिव्या दिल्याचा प्रकार समोर आला होता. गुरांच्या तस्करीवरून भाजप आमदार पिपंळे यांनी थेट बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश तूनकलवार यांना फोन केला. मात्र, याचवेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला अन थेट पोलीस अधिकाऱ्याने फोनवर शिव्या दिल्या, असा आरोप भाजप आमदाराने केला होता.

'शिव्या देणाऱ्या ठाणेदारावर तात्काळ निलंबनाची करा, अन्यथा राजकीय आमदाराची इज्जत राहणार नाही.', अशी मागणी भाजप आमदाराने गृहमंत्र्यांना ऑडिओ क्लिप पाठवत केली होती. त्यानंतर आता वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रकाश तूनकलवार यांच्यावर अकोला पोलीस अधीक्षकांनी मोठी कारवाई केली. बार्शीटाकळी पोलीस ठाण्यातून त्यांची उचलबांगडी करीत पोलीस कंट्रोल रूमला अटॅच करण्यात आले आहे. तसंच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी देखील होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येते.

नेमकं प्रकरण काय?

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश तूनकलवारांनी थेट आपल्याला फोनवर नशेत शिव्या दिल्याचा आरोप भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी केला होता. महामार्गावरून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर परस्पर पैसे घेत गुरांचे वाहन सोडून देण्यात आल्याचा आरोपही आमदारांनी केला होता. पुढे आमदार पिंपळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक ऑडिओ क्लिप पाठवली. 'आपल्याला शिवीगाळ करणाऱ्या ठाणेदारावर निलंबनाच्या कारवाईची मागणी केली होती.

आमदारासोबत असभ्य वर्तणूक केल्याप्रकरणी ठाणेदारवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अन्यथा राजकीय क्षेत्रात आमदार म्हणून इज्जत राहणार नाही.', अशा शब्दात गृहमंत्र्याकडे विनवणी केली होती. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार दुपारनंतर थेट पोलीस निरीक्षक प्रकाश तूनकलवारांवर बदलीची कारवाई करण्यात आली आहे. अकोल्याच्या पोलीस कंट्रोल रूममध्ये त्यांना अटॅच करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. लवकरच बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचा प्रभार दुसऱ्या अधिकाऱ्याला दिल्या जाणार आहे.

गृहमंत्र्यांना पाठवेलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय होतं?

आपण, मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजप आमदार. माझाच कार्यकर्ता हरीश वाघने फोन करून कत्तलीसाठी गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश तूनकलवार यांना दिली होती. त्यानंतर बार्शीटाकळी पोलिसांनी पैसे घेत गुरांचे वाहन सोडून दिलं. या संपूर्ण प्रकारानंतर आपण स्वतः अर्थातच आमदार पिंपळे यांनी ठाणेदाराला फोन केला.

त्यानंतर वादादरम्यान, आपल्यालाही शिव्या दिल्या. आज गृहखातं आपल्याकडे आहे, अशा शिव्या देणाऱ्या ठाणेदारावर तात्काळ निलंबनाची कारवाईची मागणी करण्यात आली होती. कारवाई झाली नाही तर राजकीय आमदारांची यापुढ इज्जत राहणार नाहीऐ, त्यामुळे अशा ठाणेदारावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी अपेक्षा गृहमंत्र्यांसह विधानसभा अध्यक्षांना ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून व्यक्त केली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply