Accident News : पंक्चर कार बाजूला घेताना वाहनाची धडक; दोघांचा जागीच मृत्यू, समृद्धी महामार्गावरील भीषण दुर्घटना

Sambhaji Nagar : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. यात आणखी एक अपघाताची घटना घडली असून यात समृद्धी महामार्गावरून जात असताना कारचे टायर पंक्चर झाले. यामुळे कार बाजूला घेणाऱ्या दोन जणांना अज्ञात वाहनाने धडक देत उडविले. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे.

समृद्धी महामार्गावर जयपूर शिवारात सदरची घटना घडली आहे. या अपघातात कार चालक योगेश दत्तात्रय घाटेकर (वय ३८, केळगाव, ता. निफाड, जि. नाशिक) व शेतकरी देविदास नाना मते (वय ६०, रा. जयपूर, ता. छत्रपती संभाजीनगर) हे दोघे ठार झाले आहेत. तर बाळू विश्वनाथ घाटेकर (वय ६०, राकेळगाव, ता. निफाड, जि. नाशिक) हे गंभीर जखमी झाले. जोरदार धडक दिल्यानंतर संबंधित वाहनधारक गाडी घेऊन फरार झाला आहे.

दरम्यान योगेश घाटेकर हे कारने समृद्धी महामार्गाने निफाडहून रेशीम विक्रीसाठी जालना येथे जात होते. त्यांच्यासोबत बाळू घाटेकर हे देखील होते. प्रवासादरम्यान समृद्धी महामार्गावर जयपूर शिवारात कारचे एक टायर पंक्चर झाले होते. यामुळे त्यांनी ती महामार्गाच्या बाजूला उभी केली. या वेळी त्यांनी मार्गालगत असलेल्या शेतात काम करीत असलेले शेतकरी देविदास मते हे त्यांच्या मदतीसाठी धावले.

कारजवळ उभे असताना ट्रकची धडक

तिघे जण कारच्या बाजूला उभे असताना याच दरम्यान छत्रपती संभाजीनगरकडून येणाऱ्या भरधाव आयशर ट्रक चालकाने तिघांना जोराची धडक देत उडविले. या अपघातात कार चालक घाटेकर आणि मदतीला आलेले शेतकरी मते या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गाडीत सोबत असलेले बाळू घाटेकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *