ABVP Protest in Pune University : अभाविपचा पुणे विद्यापीठात जोरदार राडा; बैठक सुरु असताना मुख्य इमारतीत घुसून तोडफोड

Pune  : पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठात आज जोरदार राडा पाहायला मिळाला. पुणे विद्यापीठात झालेल्या रॅप साँग शूटिंग प्रकरणी जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या प्रकरणी विद्यापीठात आज आंदोलन केलं. आंदोलनात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनेही केली.

अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात तोडफोड करत विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारला. कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या मेन बिल्डिंगमध्ये हा सर्व गदारोळ घातला. एकीकडे हा सर्व गदारोळ सुरु असताना दुसरीकडे कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासानाची बैठक सुरु होती. ती बैठकही अभाविपच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली. पुणे विद्यापीठातील काही वस्तूंचं यामध्ये नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

अभाविपच्या राड्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, 'रॅपसाँग प्रकरणी चौकशी सुरू असताना मोठी शैक्षणिक परंपरा असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या, छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घुसून धुडगूस घालत केलेल्या तोडफोडीच्या कृत्याचा तीव्र निषेध! एरवी आपल्या रास्त शैक्षणिक मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करणारं सरकार, आज धुडगूस घालणाऱ्यांवर काय कारवाई करणार?', असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. 

काही दिवसांपूर्वी शुभम जाधव नावाच्या मुलाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात एक रॅप साँग शूट केलं होतं. या रॅप साँगवरुन तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबत एका महिन्यात अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रॅपर शुभमवर आता चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply