10 लाखांची खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण, पुण्यात शिजला कट

पुणे : व्यावसायिकाचे अपहरण करुन त्यांच्या कुटुंबीयांकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागण्याच्या प्रकरणामध्ये लोणीकंद पोलिसांनी नेपाळ सीमारेषेजवळील गावातुन अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका केली. तसेच खंडणी मागणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांनी बॅंक खात्यावर घेतलेली एक लाख रुपयांची रक्कमही पोलिसांनी तत्काळ गोठविली.

आदील अलि (वय 22) व अब्दुल रौफ (वय 56, दोघेही रा. जोगीया उदयपुर, सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गणेश कोंडीबा दगडे (वय 38, रा. बिवरी, हवेली) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दगडे यांचा बिवरी येथे शेती व जमीन खरदी-विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपींनी त्यांच्याकडून जमीन खरेदी करुन त्यांना काही अनामत रक्कम दिली होती. तर उर्वरीत रक्कम देण्यासाठी त्यांनी फिर्यादी दगडे यांना 24 मार्च रोजी केसनंद येथे बोलावून घेतले. तेथून आरोपींनी त्यांचे जबरदस्तीने अपहरण करुन त्यांना त्यांना जीवे मारण्याची धमकी देत खंडणी उकळण्याच्या उद्देशाने नेपाळच्या सीमेलगत असलेल्या उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील जोगीया उदयपुर या गावामध्ये डांबुन ठेवले होते.

त्यानंतर आरोपींनी दगडे यांची सुटका करण्याच्या बदल्यात त्यांच्या कुटुंबीयांकडे 10 लाख रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास दगडे यांना जीवे मारण्याची धमकीही त्यांच्या कुटुंबीयांना दिली होती. त्यांच्या कुटुंबीयांनी तत्काळ लोणीकंद पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलिस उपनिरीक्षक सुरज गोरे, पोलिस कर्मचारी अजित फरांदे, सुधीर अहिवळे, सागर शेडगे यांना दगडे यांचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेशामध्ये पाठविले. संबंधित पथकाने तांत्रिक तपास केला, त्यातील विश्‍लेषणानुसार, दगडे हे नेपाळ सीमेलगतच्या सिद्धार्थनगर जिल्ह्यातील जोगीया उदयपुर येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने तेथे जाऊन छापा घातला, तेव्हा, त्यांना दगडे तेथे आढळून आले.

पोलिसांनी त्यांची सुखरुप सुटका केली. त्यानंतर दोन आरोपींना अटक करुन लोणीकंद पोलिस ठाण्यात आणले. आरोपींनी दहा लाख रुपयांपैकी एक लाख रुपयांची खंडणी त्यांच्या बॅंक खात्यावर घेतले होते. याबाबतची माहिती बॅंकेला कळवून हि रक्कम पोलिसांनी तत्काळ गोठविली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक निखील पवार, पोलिस उपनिरीक्षक सुरज गोरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक मोहन वाळके, पोलिस कर्मचारी बाळासाहेब सकाटे, कैलास साळुंके, विनायक साळवे, अजित फरांदे,सुधीर अहिवळे यांच्या पथकाने हि कामगिरी केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply