सावरकरांकडून देशाविरुद्ध इंग्रजांना मदत!; भारत जोडो यात्रेत राहुल गांधींची टीका

मालेगाव ( जि. वाशीम) : एकीकडे देशासाठी अवघ्या २४ व्या वर्षी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली. अंदमान तुरुंगातील शिक्षा कमी करण्यासाठी त्यांनी अनेकवेळा माफीची पत्रे इंग्रज सरकारला लिहिली, अशी टीका खासदार राहुल गांधी यांनी क्रांतिकारक  बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त मंगळवारी आयोजित कार्यक्रमात  केली.

राहुल गांधी म्हणाले, सावरकर खरे देशभक्त नाहीत. ते तर इंग्रज राज्यकर्त्यांकडून निवृत्ती वेतन घेत होते. बिरसा मुंडा यांनी इंग्रज सरकारच्या विरोधात उठाव केला. त्यावेळी राज्यकर्त्यांनी मुंडा यांना पैसा, जमीन देण्याचा प्रयत्न केला. आमच्या कडून जे हवे ते घ्या, पण विद्रोह करू नका असे इंग्रजांचे म्हणणे होते, पण ते आमिषाला बळी पडले नाहीत. त्यांनी इंग्रज सरकारचा सामना केला. यात त्यांना आपले प्राण गमवावे लागले. सावरकर यांची विचारधारा देशाला तोडणारी आहे, तीच विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

 खासदार राहुल गांधी यांच्या पदयात्रेचे पश्चिम विदर्भात आगमन होताच शेतकऱ्यांचे अनेक विषय समोर आले आहेत. बुधवारी भारत जोडो यात्रेला वाशीम जिल्ह्यातील जांभरुण परांडे येथून प्रारंभ झाला. पदयात्रेत राहुल गांधी यांनी शेतकरी नेत्यांसोबत चर्चा केली. यावेळी शेतकरी आत्महत्या, सिंचनाचा अनुशेष हे मुद्दे चर्चेला आले.  जांभरुण परांडे येथून सावरगाव बर्डे, झोडगा, अमानी मार्गे ही पदयात्रा मालेगाव शहरात पोहोचली. ठिकठिकाणी यात्रेचे स्वागत करण्यात आले.  ही यात्रा सायंकाळी मेडशी येथे पोहोचली. अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी पदयात्रेत राहुल गांधी यांची भेट घेतली. पश्चिम विदर्भातील ५ जिल्ह्यामधील सिंचन अनुशेष व शेतकरी आत्महत्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. डॉ. सुनील देशमुख व त्यांच्यासमवेत अनुशेष विषयतज्ज्ञ आणि विदर्भ विकास महामंडळाचे माजी सदस्य संजय खडक्कार, जेष्ठ शेतकरी नेते जगदीश बोंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावतीचे माजी सभापती किशोर चांगोले यांनीही राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली.

राहुल यांनी मालेगाव येथे दुपारच्या सत्रात मेधा पाटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील जाणकारांसोबत चर्चा केली. लोकांचे मूलभूत हक्क आणि त्याकडे होत असलेले दुर्लक्ष हे विषय यावेळी चर्चेत आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply