‘सत्य दडपण्याचा प्रयत्न झाला’; द काश्मिर फाइल्सवर PM मोदींची प्रतिक्रिया

देशात सध्या द काश्मिर फाइल्स या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. यावरून वादही निर्माण झाले आहेत. आता द काश्मिर फाइल्स या चित्रपटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी म्हणाले की,'सत्य दडपण्याचा प्रयत्न केला गेला.' भाजपच्या संसदीय गटाच्या बैठकीत बोलताना मोदींनी हे वक्तव्य केलं. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा हा चित्रपट काश्मीर खोऱ्यातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांवर आधारित आहे. १९९० ला घटलेल्या सत्यघटनांवर आधारीत हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, त्यांची पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी आणि चित्रपट निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. अभिषेक अग्रवाल यांनी सांगितलं की, पंतप्रधानांनी त्यांच्या चित्रपटाचं कौतुक केलं. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या भेटीचा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. द काश्मिर फाइल्स चित्रपटात अनुपम खेर, दर्शन कुमार आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. द काश्मिर फाइल्स चित्रपटावरून राजकीय वादही सुरु झाला आहे. यात केरळ काँग्रेसने अनेक ट्विट केल्यानं वादाला तोंड फुटलं आहे. १९९० ते २००७ या कालावधीत १७ वर्षात दहशतवादी हल्ल्यात काश्मिरी पंडितांपेक्षा जास्त मुस्लिम लोकांचा मृत्यू झाला असल्याचं केरळ काँग्रेसने म्हटलं आहे. तसंच ज्यावेळी काश्मिरमधून पंडितांचे पलायन सुरु होते तेव्हा जम्मू काश्मीरचे राज्यपाल जनमोहन होते आणि ते आरएसएसचे होते असंही केरळ काँग्रेसने म्हटलं आहे. केरळ काँग्रेसच्या दाव्यांवर भाजपने उत्तर दिलं आहे. चित्रपटातून काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. काँग्रेस आणि विरोधकांच्या तुकडे तुकडे गँगमध्ये आता खळबळ उडाली आहे. द्वेषाच्या राजकारणामुळे देशाला वाचवण्याचा, गहाण ठेवण्याचा कट रचल्याचं आता समोर येत आहे असंही भाजपने म्हटलं.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply