शिवाजी पार्कात पर्यायी भूखंड देण्याची आरएसएसची मागणी; उपक्रम राबवण्यास येतायत अडचणी

मुंबई: शिवाजी पार्क मैदानावर असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या बाजूच्या भुंखंडाऐवजी पर्यायी जागा देण्याची मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महापालिकेकडे केलीय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तसं पत्र मुंबई महापालिकेला दिलंय. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाची व्याप्ती वाढत असल्याने स्मृतिस्थळाला लागूनच असलेल्या आपल्या ताब्यातील भूखंडावर आमचे उपक्रम राबवण्यास अडचणी येतायत, असं कारण RSS ने दिलंय. त्यामुळे नाना नानी पार्कजवळील मोकळा पर्यायी भूखंड भाडेपट्ट्यावर जागेचं आरेखन करून देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलीय. (RSS's demand for alternative plot in Shivaji Park; Difficulties to RSS in carrying out activities)

1755 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या भुखंडाचं भाडं 2007 पर्यंत आरएसएसच्या वतीने भरलं जात असल्याचा दावा या पत्रात करण्यात आलाय. 1967 सालापासून हा भूखंड ऐच्छिक जमीन हस्तांतरण करारांतर्गत महापालिकेने RSS ला बहाल केल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं म्हणणं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुंबई महापालिकेला पत्र:

जी/ उत्तर विभाग दादर (प) शिवाजी पार्क येथील १७५५ चौ.मी. क्षेत्रफळाच्या मोकळ्या भूखंडाचे प्रशासकीय कारणामुळे थकीत भाडे (VLT RENT) स्विकारण्याबाबत...

मुंबई - ४००००१

महोदय,

जी/ उत्तर विभाग दादर (प) शिवाजी पार्क येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या नावे व्ही.एल.टी. तत्वावर १७५५ चौ.मी. क्षेत्रफळाच्या मोकळ्या भूखंडाचा भाडेपट्टा वर्ष १९६७ पासून महापालिकेने दिलेला आहे. वर्ष १९६७ पासून वर्ष २००७ पर्यंत आम्ही मोकळ्या भूखंडाच्या भाडेपट्ट्याचे भूभाडे (VLT RENT) भरलेले आहे. त्याच्या पावत्या सोबत जोडत आहोत. प्रशासकीय अधिकारी (मालमत्ता) जी/ उत्तर विभाग यांनी वर्ष २००८ पासून भूभाडे घेण्यापूर्वी जागेचे आरेखन करण्यासाठी आग्रह धरल्याने व प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आजतागायत जागेचे आरेखन न झाल्याने प्रशासकीय कारणास्तव वर्ष २००८ पासून आजतागायत भूभाडे थकीत आहे. आम्ही हे भूभाडे भरण्यास तयार आहोत व यापूर्वीही वारंवार भूभाडे भरण्यासाठी प्रशासकीय अधिकारी (मालमत्ता) जी/ उत्तर विभाग यांच्याकडे गेलो असता ते आरेखनाशिवाय स्विकारण्यास असमर्थता दर्शवली. या एकाच कारणामुळे भूभाडे थकीत राहिले आहे..

वर्ष १९३६ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दैनंदिन शाखा शिवाजी पार्क मैदानात लागते. वर्ष १९६७ पासून VLT भूखंड राष्ट्रीय स्वयंसेवक संघास वितरित केलेला आहे. या १७५५ चौ.मी. क्षेत्रफळाच्या मोकळ्या भूखंडाचे भूभाडे वर्ष २००७ पर्यंत भरलेले आहे. या व्ही.एल.टी. भूखंडाचा मालमत्ता कर ०१.०४.१९६७ पासून वर्ष २०२१-२२ पर्यंत भरलेला आहे. याबाबत कागदपत्रे सोबत जोडीत आहोत.

आमच्या सध्याच्या VLT भूखंडाजवळ स्मृतीस्थळ आल्यामुळे आम्हाला आमच्या ताब्यातील VLT भूखंडावर आमचे उपक्रम राबविण्यास अडचणी येत आहेत. तसेच स्मृती स्थळामुळे जागेचे आरेखन करणे जिकीरीचे होईल असे वाटते. वरील वस्तुस्थिती लक्षात घेता आम्ही आपणांस विनंती करतो की,

१) सदर जागेचे थकीत भूभाडे (VLT RENT) तातडीने स्वीकारण्यात यावे.

२) स्मृती स्थळाची वाढती व्याप्ती लक्षात घेता सदर भूभागाऐवजी शिवाजी पार्क मैदानाजवळील नाना नानी पार्क जवळील मोकळा पर्यायी भूखंड भाडेपट्ट्यावर जागेचे आरेखन करून देण्यात यावा.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply