“शिंदेंकडून गृह आणि अर्थ खात्याची मागणी झाली पण फडणवीसांनी…”; ‘मातोश्री’चा उल्लेख करत मिटकरींचं विधान

मंत्रीमंडळ विस्तारानंतर भाजपामध्ये महत्वाची खाती असल्याने शिंदे गटामध्ये नाराजी असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी याच खातेवाटपावरुन मोठं भाकित व्यक्त केलं आहे. शिंदे गटातील काही आमदार खातेवाटपावरील नाराजीमुळे पुन्हा ‘मातोश्री’मध्ये जाऊन बसतील, असं मिटकरी म्हणाले आहेत. इतकच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गृह आणि अर्थ खातं मागितलं होतं असा दावाही मिटकरींनी केला आहे.

शिंदे गटाकडे आणि भाजपाकडे कोणी खाती?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खाते कायम ठेवले असून, गृह आणि अर्थ ही सर्वात प्रभावी खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. आधीच्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये शिवसेनेकडे असलेल्या मंत्र्यांची खाती शिंदे गटाकडे कायम ठेवण्यात आली आहेत. राष्ट्रवादीकडे असलेली सर्व प्रभावी आणि मलईदार खाती भाजपाच्या वाट्याला गेली आहेत. शिंदे गटाकडे नगरविकास, परिवहन, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, कृषी, सार्वजनिक बांधकाम (रस्ते विकास मंडळ), पणन, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, अल्पसंख्याक, उद्योग, पाणीपुरवठा, बंदरे, खाणकाम, अन्न व औषधे प्रशासन, शालेय शिक्षण ही खाती आली आहेत.

फडणवीसांच्या निकटवर्तीयांना महत्त्वाची खाती
गृह, अर्थ, महसूल, सहकार, उर्जा, गृहनिर्माण, जलसंपदा, ग्रामविकास, आदिवासी विकास, वैद्यकीय शिक्षण ही सर्व महत्त्वाची खाती भाजपाकडे राहणार आहेत. भाजपामध्ये खातेवाटपाच्या यादीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र निकटवर्तीयांच्या वाट्याला महत्त्वाची खाती आली आहेत. मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य ही खाती सोपविण्यात आली आहेत. आधीच्या फडणवीस सरकारमध्ये चंद्रकांतदादांनी महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकारसारखी महत्त्वाची खाती भूषविली होती. या तुलनेत उच्च व तंत्रशिक्षण वा वस्त्रोद्योग ही दुय्यम खाती मानली जातात. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे त्यावेळी अर्थ आणि वने ही खाते होती. आता त्यांच्याकडे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्सव्यवसाय या खात्यांचा पदभार सोपविण्यात आला आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply