शरीर-मनाच्या जखमांनी पीडितेचा रात्रभर आक्रोश; भंडारा बलात्कार : सरकारी दिरंगाईमुळे उशिराने मदत; वेळ वाया गेल्याने प्रकृती गंभीर

कन्हाडमोह (भंडारा) : नागपूर – रायपूर महामार्गावरील कन्हाडमोह हे छोटे खेडे.. पहाट उजाडताच नेहमीप्रमाणे गावातील तरुण महामार्गावरील पुलाजवळ व्यायाम करायला गेले.. इतक्यात त्यांची नजर रस्त्याशेजारी असह्य वेदनेने विव्हळणाऱ्या महिलेवर पडली.. महिला विवस्त्र होती, पोटापासून पायापर्यंत अर्धे शरीर रक्ताने माखले होते.. कुणीतरी अतिशय निर्दयीपणे बलात्कार करून महिलेला गावाजवळ आणून फेकले होते.. प्रचंड रक्तस्त्रावामुळे प्रकृती धोक्यात होती.. तातडीने उपचाराची गरज होती.. परंतु, प्रशासनाला वेळीच खबर देऊनही अपेक्षित सरकारी दिरंगाई झालीच. परिणामी ती पीडिता आता नागपूरच्या मेडिकलमध्ये एका-एका श्वासासाठी झुंजत आहे..

गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील ही दुर्दैवी पीडिता. निर्दयी पतीने वाऱ्यावर सोडल्याने बहिणीच्या आश्रयाने राहायची. पण, एका किरकोळ वादातून तिने बहिणीचे घर सोडले आणि इथेच तिच्या दुर्दैवाचा फेरा सुरू झाला.. रागाच्या भरात ती एकटीच माहेरच्या दिशेने पायी निघाली. रस्त्यात आधी एका कारचालकाने मदतीचे आश्वासन देऊन तिच्यावर तब्बल दोन दिवस बलात्कार केला. त्याच्या तावडीतून सुटून कशीतरी ती पुन्हा महामार्गाला लागली. हातात पैसे नाही, घशाला कोरड पडलेली म्हणून एका पंक्चर दुरुस्ती करणाऱ्याच्या दुकानात थांबली. तर त्याचीही नियत फिरली. त्याने दुचाकीवर घरी पोहोचविण्याचे आमिष दाखवून आणखी एकाला सोबत घेऊन तिला गावाबाहेरच्या शेतात नेले व तिथे आळीपाळीने अत्याचार केला.

गावातील पोलीस मित्राने महिला पोलीस पाटलाला याबाबत कळवले. त्यांनी घरातील चादरीने पीडितेचे अंग झाकले. गावात आणताच इतर महिलांनी साडी  दिली. कारधा पोलीस ठाण्याला कळवण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक ताफ्यासह पोहचले. सोबत रुग्णवाहिका होती.

अधीक्षकाचे पद रिक्त..

हे सामूहिक बलात्काराचे गंभीर प्रकरण उघडकीस आले तेव्हा भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षकांचे पद रिक्त होते. भंडाराचे तत्कालीन पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी एका शाळेच्या प्रकरणात स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावर गुन्हा नोंदवला होता. त्याचा राग मनात धरून आता शिंदे गटात सामील झालेल्या भोंडेकर यांनी मुख्यमंत्री शिंदेंना सांगून वसंत जाधव यांची तडकाफडकी बदली करून घेतल्याची चर्चा आहे. अधीक्षकच नसल्याने भंडाऱ्याचे पोलीस प्रशासन वाऱ्यावर होते. त्याचाही फटका या प्रकरणातील तपासाला बसल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक पद रिक्त असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यावर टीका होऊ नये म्हणून जाधव यांच्या जागी गुरुवारी उशिरा रात्री नागपूर परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे कळते.

प्रकृती बिकट.

पीडितेची स्थिती खूपच गंभीर आहे. वारंवार तिची शुद्ध हरपत आहे. तिला रुग्णालयात आणले तेव्हा काहीवेळ शुद्धीवर असताना तिने पोलिसांना घटनेची जुजबी माहिती दिली. त्यावरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली. मूळ घटनास्थळ गोंदिया जिल्ह्यात असल्याने हे प्रकरण भंडाऱ्याहून गोंदिया पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

दिल्ली प्रकरणाहून भीषण..

बलात्कार करूनच हे नराधम थांबले नाहीत तर पीडितेच्या गुप्तांगावर त्यांनी कुठल्यातरी शस्त्रांनी गंभीर जखम केली. त्यामुळे पीडितेच्या गर्भाशयापर्यंतचा भाग चिरला गेला.  अत्याचाराने शुद्ध गमावलेल्या पीडितेला या नराधमांनी कन्हाडमोह गावाच्या शेजारी फेकून पळ काढला. तब्बल रात्रभर ती तशीच पडून होती. पहाटे गावकरी मदतीला धावले.

ठरवण्यात वेळ वाया..

पीडितेला जवळच्या लाखनी येथील रुग्णालयात न्यायचे की समोर भंडाऱ्याला हे ठरवण्यात वेळ गेला. अखेर भंडाऱ्याला हलवले. परंतु, तेथील जिल्हा रुग्णालयात बलात्कार प्रकरणात आवश्यक वैद्यकीय चाचणीची सोय नसल्याने व पीडितेची प्रकृती आणखी गंभीर झाल्याने नागपूरला पाठवण्यात आले. परंतु, या दिरंगाईत पीडिता मृत्यूच्या दारात पोहोचली.

वैद्यकीय चाचणीची गैरसोय

पीडितेला जवळच्या लाखनी येथील रुग्णालयात न्यायचे की समोर भंडाऱ्याला हे ठरवण्यात वेळ गेला. अखेर भंडाऱ्याला हलवले. परंतु, तेथील जिल्हा रुग्णालयात बलात्कार प्रकरणात आवश्यक वैद्यकीय चाचणीची सोय नसल्याने व पीडितेची प्रकृती आणखी गंभीर झाल्याने नागपूरला पाठवण्यात आले. परंतु, या दिरंगाईत पीडिता मृत्यूच्या दारात पोहोचली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply