वर्धा : ऑन ड्युटी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला ट्रकने चिरडले, ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल

वर्धा : ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याचं ट्रकने दिलेल्या जबर धडकेत मृत्यू झाला आहे. वर्ध्यातील खंडाळा परिसरातील ही घटना आहे. या प्रकरणी पोलिसांना आरोपी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

समुद्रपूर तालुक्यातील नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील खंडाळा शिवारात जामच्या महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी वाहनांची तपासणी करत होते. यादरम्यान तपासणी सुरु असलेल्या उभ्या टिप्परला मागून येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की ट्रक थेट पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर आला.

या विचित्र अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. गौरव खरवडे असे मृत वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते जामच्या महामार्ग पोलीस मदत केंद्रामध्ये कार्यरत होते.

पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र पटले यांच्या मार्गदर्शनात या मदत केंद्राचे दहा पोलीस कर्मचारी सकाळी महामार्गावर नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करत होते. यावेळी टिप्परला पोलीस कर्मचारी गौरव खरवडे यांनी थांबवून कागदपत्राची तपासणी सुरु केली. यादरम्यान या टिप्परच्या मागून भरधाव आलेल्या ट्रकने टिप्परला धडक दिली.

या धडकेत टिप्पर खरवडे यांच्या अंगावर जात दुभाजकावर चढला. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना समुद्रपुरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी ट्रक चालक सुनील ढोणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गौरव खरवडे हे उत्साही कर्मचारी म्हणून पोलीस विभागात ओळखले जात होते. त्यांच्या अशा या अपघाती मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply