“राष्ट्रवादी नव्हे, घराणेशाही पक्ष”; निर्मला सीतारामन यांची बारामतीत टीका

पुणे : ज्यांच्या नावात राष्ट्रवादी आहे ते विकास कामात पक्षपातीपणा करत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस घराणेशाहीचा पक्ष आहे. राष्ट्रवादीमध्ये घराणेशाहीचीच परंपरा आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांची कामे होत नाहीत. घराणेशाहीमुळेच काँग्रेसची अवस्था बिकट झाली, हे लक्षात घ्यावे, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात विजय मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने बारामती मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत सीतारामन बारामतीच्या दौऱ्यावर आल्या होत्या. रायबरेली, अमेठीतील घराणेशाहीबद्दल नागरिक काय म्हणातात हे पाहा, असे सांगत घराणेशाही आणि भ्रष्टाचाराविरोधात भाजपा उभे राहणार असल्याचे सीतारामन म्हणाल्या.

दौऱ्यादरम्यान सीतारामन यांनी बारामती शहर भाजपा कार्यालयाला भेट दिली. सहकार मेळाव्याबरोबरच नवमतदार, महिला मोर्चा, प्रमुख गावांनाही त्यांनी भेट दिली. बारामतीमध्ये भारतीय जनता पक्षाला सशक्त आणि मजबूत करण्याचा उद्देश आहे. २०२४ नंतरही बारामतीमध्ये सतत येणार, पक्ष ठरवेल तेंव्हा येणार असे सीतारामन यांनी जाहीर केले. सहकार मेळाव्यातही त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली.

पंतप्रधान विरोधकांच्या जिल्ह्यातही प्रगतीच्या योजना पोहोचवित आहेत. भाजपा कार्यकर्ता आणि लोकप्रतिनिधींना विकासासाठी निधी दिला जात नाही. बारामतीमध्ये एकाच ठिकाणी प्रगती झाली आहे. लोकसभा मतदारसंघातील अन्य भागाकडे दुर्लक्ष आहे, तशा तक्रारी नागरिकांनी माझ्याकडे केल्या आहेत. बारामतीमधील भ्रष्टाचार आणि घराणेशाही विरोधात आता भाजपा काम करणार आहे. बारामतीमधील घराणेशाही संपविली तर बारामतीचा विकास होईल, असे सीतारामन यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाने सर्वसामान्य नागरिकांसाठी काम केले पाहिजे. त्यासाठी बूथ रचना सक्षम करण्याला प्राधान्य राहिले पाहिजे. बारामती लोकसभा मतदारसंघातील सहापैकी तीन मतदारसंघात बोगस मतदार आहेत, अशी तक्रार आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी बोगस मतदार शोधावेत. बोगस मतदार शोधले तर बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा खरा आवाज बाहेर येईल, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

बारामती दौऱ्यापूर्वी निर्मला सीतारामन यांनी जेजुरी आणि त्यानंतर मोरगांव गणपती मंदिराला भेट दिली. दरम्यान, बारामतीमधील भाजपा विरोधात लावण्यात आलेले फलक पोलिसांकडून हटविण्यात आले. तर पुण्यात निर्मला सीतारामन यांच्या फलकाला काळे फासण्याचा प्रकार घडल्याचेही समोर आले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply