राज्यातील राजकारणात ‘स्लो पॉयझनिंग’, मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचं टीकास्त्र, महापालिकेतील बहुसदस्यीय वार्ड पद्धतीवर नोंदवला आक्षेप

मुंबईतील रविंद्रनाट्य मंदिरात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारणाचा खेळखंडोबा झाल्याचा हल्लाबोल केला. उत्तर प्रदेश, बिहारसारखं राजकारण महाराष्ट्रात सुरू झालं आहे. हे ‘स्लो पॉयझनिंग’ संपवण गरजेचं असल्याचं मत यावेळी राज ठाकरेंनी मांडलं. एकेकाळी ज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं, त्याच महाराष्ट्राचं प्रबोधन करण्याची वेळ आता आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी राज्यातील मतदारांना देखील धारेवर धरलं. जनता राजकारणाला तुच्छ, फालतू समजते. मग याच राजकारणासाठी दोन-दोन तास रांगेत उभं राहून मतदान करते. मग हे राजकारण तुच्छ कसं? असा सवाल ठाकरेंनी मतदारांना केला. जाती, धर्म किंवा नातेवाईकांना मतदान करणाऱ्यांना देखील ठाकरेंनी यावेळी फटकारलं. प्रत्येक स्री-पुरुषांनी राजकारणात आलं पाहिजे. मतं मागणाऱ्याला जाब विचारला पाहिजे, असं आवाहन ठाकरेंनी केलं.

महापालिकांच्या प्रभागरचनेवरुन या मेळाव्यात राज ठाकरेंनी सरकारवर टीका केली. महापालिकेतील बहुसदस्यीय वार्ड पद्धतीवर त्यांनी आक्षेप नोंदवला. बहुसदस्यीय वार्ड पद्धत राबवताना लोकांना गृहित धरलं जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा, यावर कार्यकर्त्यांनी एकमेकांची उणीधुणी काढत बसू नये, असे ठाकरे यावेळी म्हणाले. असे आढळल्यास पक्षातून हकालपट्टी केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. महापालिका निवडणुका दिवाळीच्या आधी होण्याची शक्यता कमी असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले. पक्षाची आंदोलनं, कामं लोकांपर्यंत पोहोचवा, असं आवाहन ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना केलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply