राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया, दीपक केसरकर म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…”

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुजराती आणि राजस्थानी लोकांनी पैसा काढून घेतला तर मुंबईला आर्थिक राजधानीच म्हटलं जाणार नाही, असं वक्तव्य केलं. यावर जोरदार टीका होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटालाच लक्ष्य केलं. यानंतर आता शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी कोश्यारी यांचं हे वक्तव्य राज्याचा अपमान करणारं असल्याचं म्हटलंय. तसेच याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्र सरकारकडे तक्रार करतील, अशी माहिती दिली. ते शनिवारी (३० जुलै) एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

दीपक केसरकर म्हणाले, “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जे वक्तव्य केलं ते राज्याचा अपमान करणारं वक्तव्य आहे. राज्यपाल हे एक संवैधानिक पद आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यांच्याबाबत केंद्र सरकारकडे तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार असतो. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी विधानं पुन्हा होऊ नये म्हणून केंद्र सरकारला पत्र पाठवतील. केंद्र सरकार राज्यपालांना अशी विधानं न करण्याबाबत सांगतील.”

“मुंबई केवळ दोन समाजाची नाही”

“मुंबई हे बहुसांस्कृतिक लोकांचं शहर आहे, ते केवळ दोन समाजाचं नाही. मुंबईच्या विकासात अनेक समाजांचं योगदान आहे. मुंबईच्या उभारणीत सर्वाधिक वाटा मराठी माणसाचा आहे ही देखील वस्तूस्थिती आहे. म्हणून दोनच समाज का? मुंबईतील औद्योगिक विकासासाठी पारसी समाजाने फार मोठं योगदान दिलं आहे. एखाद्या समाजाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या समाजाच्या योगदानावर बोलायचं असतं. परंतु त्यांनी पैसा काढून घेतला तर मुंबईत काही शिल्लक राहणार नाही म्हणजे त्यांनी मुंबईचा अभ्यास केलेला नाही,” असं दीपक केसरकरांनी सांगितलं.

“मुंबई आर्थिक राजधानी का आहे? कारण बहुतांश बँकांची मुख्यालयं मुंबईत आहेत. अगदी भारतीय रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय (RBI) मुंबईत आहे. आर्थिक राजधानी कशाला म्हणतात, तर पूर्वी भारताच्या एकूण करापैकी ४० टक्के हिस्सा मुंबईतून येत होता. हे योगदान केवळ एका समाजाचं नाही, तर सर्व समाज एकत्र आले. यात पंजाबमधील उद्योगपती, मारवाडी यांचा समावेश आहे. केवळ काठी आणि लोटा घेऊन लोक आली आणि त्यांना या शहरानं आसरा दिला, मोठं केलं. कुणीही बाहेरून गुंतवणूक घेऊन मुंबईत आलं नाही,” असंही केसरकरांनी नमूद केलं.

भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.”



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply