मोठी बातमी! काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबेंची पदवीधर निवडणुकीतून माघार, मुलगा सत्यजीत तांबेंकडून अपक्ष अर्ज दाखल

महाविकासआघाडीकडून नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेसला देण्यात आली. काँग्रेसनेही डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी घोषित केली. सुधीर तांबे काँग्रेसकडून तीनवेळा या मतदारसंघातून निवडून आले होते. काँग्रेसकडून सुधीर तांबे यांच्याच नावाने एबी फॉर्म आला, मात्र, ऐनवेळी सुधीर तांबेंनी आपली उमेदवारी मागे घेत मुलगा सत्यजीत तांबे यांचा अर्ज दाखल केला. याबाबत स्वतः सुधीर तांबेंनी माहिती दिली. ते गुरुवारी (१२ जानेवारी) नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

सुधीर तांबे म्हणाले, “सत्यजीत तांबे राज्यात जे तरुण मुलं नेतृत्व करत आहेत त्यात एक दूरदृष्टी असलेलं युवानेतृत्व आहे. त्यांना वेगवेगळ्या विषयांचं सखोल ज्ञान आहे. त्यामुळे हे या निवडणुकीत हे नेतृत्व द्यावं असं आमचं ठरलं. त्यामुळे आम्ही सत्यजीत तांबे यांचा अर्ज भरला आहे. हा अर्ज महाविकासआघाडीच्या वतीने भरला आहे.”

“फक्त सत्यजीत तांबे यांचाच अर्ज भरला आहे. सत्यजीत तांबेंच्या नावाला काँग्रेसमधील काही पक्षश्रेष्ठींनी विरोध केला असं नाही. कोणी विरोध केला असेल असं मला वाटत नाही. कारण आमच्या पक्षाचंही हे धोरण आहे की, तरुण लोक राजकारणात आली पाहिजेत. काँग्रेसने तरुणांना संधी देण्याचं मोठं काम केलं,” असं मत सुधीर तांबेंनी व्यक्त केलं.

सुधीर तांबे पुढे म्हणाले, “शेवटच्या क्षणापर्यंत विचार सुरू असतात. त्यामुळे माझ्या नावाची घोषणा झालेली असतानाही सत्यजीत तांबे यांचा अर्ज दाखल केला. सत्यजीत तांबेंनी दोन अर्ज भरले आहेत. एबी फॉर्म माझ्या नावाने आला होता. त्यामुळे थोड्या तांत्रिक अडचणी आहेत. परंतु या निवडणुकीत निवडणूक चिन्ह नसतं. त्यामुळे सत्यजीत या निवडणुकीत महाविकासआघाडीचे उमदेवार म्हणून उभे आहेत.”

“सत्यजीत तांबे हे एक चांगलं नेतृत्व आहे. इथं बऱ्याच गोष्टी अशा असतात की, पक्षाच्याही पलिकडे विचार करावा लागतो. सर्वच पक्ष तसा विचार करत असतात. सर्वच पक्ष सत्यजीत तांबेंना मदत करतील अशी आमची अपेक्षा आहे,” असंही सुधीर तांबेंनी नमूद केलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply