‘मूठभर लोक म्हणजे समाज नव्हे,’ मराठा क्रांती मोर्चाच्या ‘त्या’ भूमिकेनंतर संभाजीराजे छत्रपतींचे वक्तव्य; म्हणाले “राजवाडा, घरदार सोडून…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस तसेच अन्य महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (२७ ऑगस्ट) आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाविषयक बैठकीत मराठा नेत्यांमधील मतभेद समोर आले. या बैठकीत आम्हाला बोलूच दिले नसल्याचा आरोप काही मराठा नेत्यांनी केला. तर छत्रपती संभाजीराजेंचं नेतृत्वच मान्य नसल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतली. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या या भूमिकेनंतर संभाजीराजे यांनी प्रतक्रियी दिली आहे. माझे प्रामाणिक कार्य पाहून कित्येक संघटनांनी, लोकांनी अनेकवेळा माझ्याकडे नेतृत्व दिले, पण कधीही मी स्वतःहून हे नेतृत्व स्वीकारले नाही. नेता म्हणून मिरवलो नाही. माझा राजवाडा, घरदार सोडून वैभवसंपन्न जीवनशैली सोडून मी कित्येक महिने समाजासाठी राज्यभर फिरत असतो, असे म्हणत मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत माझा लढा सुरूच राहील, अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली आहे.

फेसबुकवर लिहिणारे आणि मीडियावर बोलणारे राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधलेले काल आलेले मूठभर लोक म्हणजे समाज नव्हे. शेतशिवारात राबणारा शेतकरी, विविध क्षेत्रांत मेहनतीने काम करणारा कष्टकरी, देशाच्या उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न पाहणारा विद्यार्थी आणि या सर्वांचे पालनपोषण करणाऱ्या माझ्या माता भगिनी म्हणजे माझा मराठा समाज आहे. पंधरा वर्षे मी त्यांच्यासोबत राहून, तळागाळात काम करून, समाजासाठी लढा देऊन, स्वतःच्या राजकीय भवितव्यापेक्षा नेहमीच समाजाच्या भल्याचा प्रथम विचार करून त्यांचा विश्वास, प्रेम आणि पाठबळ कमावले आहे, ते कुठल्या स्वयंघोषित नेत्यांमुळे कमी होणार नाही, असे मत संभाजीराजे यांनी फेसबूक पोस्टद्वारे मांडले आहे.

माझे प्रामाणिक कार्य पाहून कित्येक संघटनांनी, लोकांनी अनेकवेळा माझ्याकडे नेतृत्व दिले, पण कधीही मी स्वतःहून हे नेतृत्व स्वीकारले नाही. नेता म्हणून मिरवलो नाही. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे समाजाचा एक सेवक म्हणूनच कार्यरत राहिलो व यापुढेही राहीन. समाजासाठीचा माझा हा लढा मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहील,” असेदेखील छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू झालेला मराठा क्रांती मोर्चा हा सध्या काही जणांनी कुठे नेऊन ठेवलाय, हे समाज उघड्या डोळ्यांनी बघतो आहे. वेगवेगळ्या पक्षांशी व नेत्यांशी संधान बांधून अनेकांनी वैयक्तिक स्वार्थ साधून घेतले. पाठीशी काहीही कार्यकर्ते अथवा संघटनात्मक ताकद नसताना देखील केवळ समाजाच्या नावावर आपल्या पोळ्या भाजल्या. सत्ताधारी व विरोधी पक्षांतील कित्येक राजकीय नेत्यांनी देखील जाणीवपूर्वक अशा लोकांना खतपाणी घातले व आजही घालत आहेत. पण समाज डोळस आहे. तुम्ही फार काळ समाजाला असे फसवू शकत नाही, असे म्हणत संभाजीराजेंनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply