मुंबई: १६ वर्षीय मुलीला ‘आयटम’ म्हणणं तरुणाला पडलं महागात, कोर्टाने सुनावली दीड वर्षांची शिक्षा

मुंबई : एका १६ वर्षीय मुलीला ‘आयटम’ संबोधणं एका २५ वर्षीय व्यावसायिकाला चांगलंच महागात पडलं आहे. या प्रकरणी पोक्सो न्यायालयाने आरोपीला दीड वर्षांचा तुरुंगवास सुनावला आहे. आरोपीनं पीडितेचे केस ओढून तिला “क्या आयटम किधर जा रही हो?” असं विचारलं होतं. ‘आयटम’ हा शब्द मुलीचा लैंगिक छळ करण्यासाठीच वापरला असल्याचं निरीक्षण नोंदवून न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे.

२५ वर्षीय आरोपी पीडितेशी लैंगिक संबंध ठेवण्याच्या हेतुनेच तिचा पाठलाग करत होता, असंही न्यायालयाने निदर्शनास आणलं आहे. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली. भविष्यात चांगलं वर्तन करण्याच्या आश्वासनावर आरोपीची सुटका करण्यास न्यायालयाने नकार दिला. यावेळी विशेष न्यायाधीश एस जे अन्सारी म्हणाले, “अशा गुन्ह्यांत कठोर कारवाई करणं आवश्यक आहे. महिलांचं संरक्षण करण्यासाठी आणि रोड रोमियोंना धडा शिकवण्यासाठी अशा शिक्षेची गरज आहे.”

दरम्यान, आरोपीनं पोक्सो न्यायालयात दावा केला की, पीडितेचे पालक पीडितेशी असलेल्या मैत्रीच्या विरोधात होते. त्यामुळे त्यांनी मला खोट्या प्रकरणात गोवलं आहे. या दाव्यानंतर जुलै महिन्यात पीडितेला न्यायालयात हजर केलं असता, तिने आरोपीचा दावा फेटाळून लावला आहे. आरोपीचा दावा सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे कोणतेही सबळ पुरावे नव्हते. ही बाब लक्षात घेऊन न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.

पीडितेनं दिलेल्या जबाबानुसार, १४ जुलै २०१५ रोजी दुपारी दीड वाजता पीडित अल्पवयीन मुलगी शाळेत जात होती. यावेळी आरोपी वाटेत त्याच्या काही मित्रांसोबत बसला होता. त्याचदिवशी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास पीडित मुलगी शाळेतून घरी परतत होती. तेव्हाही आरोपी त्याच ठिकाणी आपल्या बाईकवर बसला होता. पीडितेला परत येताना पाहून आरोपीने तिचा पाठलाग सुरू केला. तिच्यामागे येत आरोपीनं तिचे केस ओढले आणि “क्या आयटम किधर जा रही हो?” असं विचारलं. यावेळी पीडितेनं असं करू नका, अशी विनंती केली, पण आरोपीनं तिची छेड काढत शिवीगाळ केली. यानंतर पीडितेनं तातडीने ‘१००’ क्रमांकावर फोन केला. पोलीस घटनास्थळी येईपर्यंत आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply