मुंबई : शिंदे गटाविरोधातील पहिली कायदेशीर लढाई शिवसेनेने जिंकली

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेची सूत्रे कोणाकडे, चिन्हाचा वाद यावरून कायदेशीर लढाई सुरू असतानाच दसरा मेळाव्यावरून नव्याने निर्माण झालेल्या वादात उच्च न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये घेण्यास परवानगी दिल्याने शिवसेनेने शिंदे यांच्या विरोधातील   पहिली न्यायालयीन लढाई जिंकली आहे.

शिंदे गटाने शिवसेनेवर दावा केला आहे. आमचीच शिवसेना खरी, अशी भूमिका या गटाने घेतली आहे. तसेच शिवसेनेचे धनुष्यबाण या चिन्हावरही दावा केला आहे. हे सारे मुद्दे सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. पुढील आठवडय़ात पाच सदस्यीय खंडपीठासमोर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. दुसरीकडे, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून वाद निर्माण झाला होता. हा वाद उच्च न्यायालयात होता. उच्च न्यायालयाने शिवसेनेची शिवाजी पार्कची मागणी मान्य केल्याने शिवसेनेने शिंदे गटावर पहिल्या कायदेशीर लढाईत मात केली आहे. उच्च न्यायालयाच्या निकालाने शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

न्यायालयाने दिलेल्या परवानगीमुळे शिवसेना आणि शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा हे समीकरण कायम राहिले आहे. शिवसेनेच्या स्थापनेनंतर लगेचच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परंपरा पडली. ‘विचारांचे सोने लुटण्यासाठी शिवतीर्थावर चला,’ अशी शिवसेनेची तेव्हा घोषणा असायची. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुमारे तासभराच्या भाषणात शिवसैनिकांना आगामी वाटचालीची दिशा द्यायचे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील बाळासाहेबांच्या भाषणाकडे राजकीय वर्तुळातील साऱ्यांचेच लक्ष असायचे. कारण ठाकरे कोणाची टोपी उडवतील वा कोणाला टीकेचे लक्ष्य करतील याची उत्सुकता असायची. बाळासाहेबांचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे शिवसैनिकांना पर्वणीच असायची.

सुमारे ५० वर्षांच्या शिवसेनेच्या कार्यकाळात  चार-पाच वेळाच दसरा मेळाव्यात खंड पडला. पावसाने मैदानात चिखल झाल्याने २००६ मध्ये मेळावा रद्द करावा लागला होता. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातही २०१४ व २०१९ मध्ये दसरा मेळावा झाला नव्हता. दसरा मेळावा हा नेहमी सायंकाळी होतो. सुरक्षेच्या कारणावरून मागे एकदा दसरा मेळावा सकाळी घेण्यात आला होता. गेली दोन वर्षे करोनामुळे दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात झाला नव्हता, पण ठाकरे यांनी ऑनलाइन पद्धतीने शिवसैनिकांशी संवाद साधला होता.

बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीही दसरा मेळाव्यात तेवढाच जोष असतो आणि गर्दीही होत असते. यंदाचा दसरा मेळावा शिवसेनेसाठी महत्त्वाचा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खरी शिवसेना कोणाची, हा कायदेशीर वाद सुरू आहे.  उद्धव ठाकरे यांना शक्तिप्रदर्शनाची ही संधी आहे. शिवसेना संपलेली नाही हे ठाकरे यांना दाखवून द्यायचे आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात खोडा घालून शिवसेनेला खिजविण्याची शिंदे गटाची योजना होती; पण शिवाजी पार्कवर ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. शिंदे गटाला बीकेसी मैदानात मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळाली आहे.

शक्तिप्रदर्शन..

शिवसेनेचा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा बीकेसी मैदानात एकाच वेळी मेळावा झाल्यास शिवसेनेच्या दोन गटांमध्ये मेळाव्यात जास्त गर्दी जमविण्यावरून स्पर्धा होईल. शिंदे गट जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply