मुंबई : माऊंटमेरी चर्चवर लष्कर-ए-तैय्यबाकडून हल्ल्याचा ई-मेल

मुंबईतील प्रसिद्ध माऊंट मेरी चर्चवर लष्कर-ए-तैय्यबा या दहशतवादी संघटनेकडून हल्ला होणार असल्याचा ई-मेल आला असून याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी संदेश पाठवणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती वांद्रे पोलिसांसह गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, तपासणीत त्या संदेशात कोणतेही तथ्य नसल्याचे आढळले. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

माऊंट मेरी चर्चचे अधिकृत छायाचित्रकार पीटर डॉमनिक डिसोझा (५८) यांच्या ई-मेल चर्चच्या अधिकृत संकेतस्थळाशी जोडण्यात आला आहे. माऊंट मेरी चर्चच्या अधिकृत संकेतस्थळावर येणारे सर्व ई-मेल त्यांच्या मोबाइलवर येतात. बुधवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास ‘टेररिस्ट’ या युजर आयडीवरून लष्कर-ए-तैय्यबा या दहशतवादी संघटनेकडून हल्ला होणार असल्याचा ई-मेल आला होता. त्यानंतर आणखी एक ई-मेल आला असून त्यात माझ्या मुलाची मानसिक स्थिती ठीक नसून त्याला क्षमा करावी, तसेच त्याने केलेला दावा खोटा असल्याचेही दुसऱ्या मेलमध्ये नमुद करण्यात आले होते. पण डिसोझा यांनी खबरदारीचा उपाय म्हणून याबाबत चर्च प्रशासनाला माहिती दिली व वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम ५०५ (३) (सार्वजनिक शांतता भंग होईल असे विधान करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तपासणीत संकेतस्थळाच्या क्लासिफाईडमध्ये संदेश पाठवण्यात आला आहे. डिसोझा यांचे ई-मेल संकेतस्तळाशी जोडल्यामुळे त्यांना संबंधित मेल प्राप्त झाला. याप्रकरणी तपासणीत कोणतेही तथ्य नसल्याचे आढळून आले आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

यापूर्वी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरून २६/११ सारखा भीषण दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारे संदेश आले आहेत. त्याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका अनोळखी क्रमांकावरून संदेश प्राप्त झाला आहे. सोमालियातील मोबाइल क्रमांकावरून हा संदेश पाठवण्यात आला होता. त्यात त्यांच्या देशात घडलेल्या दहशतवादी घटनांच्या अनुषंगाने खबरदारी बाळगण्याची सूचना करण्यात आली होती. सांताक्रूझ येथेही एका व्यक्तीला घातपाताच्या धमकीचा व्हिडिओ कॉल आला होता. अशा घटनांमुळे सुरक्षा यंत्रणांवर ताण येत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply