मुंबई : एकनाथ शिंदेंसह १२ जणांची आमदारकी रद्द करा; सेनेची नरहरी झिरवळ यांच्याकडे याचिका

मुंबई : एकनाथ शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले आहेत. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. त्यानंतर सत्ता वाचवण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाने पावले उचलायला सुरुवात केली आहे. शिवसेनेने १२ आमदारांना निलंबित करण्याचे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ देण्यात आल्याची माहिती शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेनेची अंतर्गत धूसफूस चव्हाट्यावर आली आहे. त्यानंतर शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याजवळ चाळीसहून अधिक आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे शिंदे गटाचं राजकीय पारडं जड झालं आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासहित १२ आमदारांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी शिवसेनेने १२ आमदारांना निलंबित करण्याचे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना दिले आहे. पक्षाने बोलावलेल्या बैठकीत आमदार उपस्थित न राहिल्याने कारवाईचे पत्र विधानसभा उपाध्यक्षांना दिले आहे. खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, गटनेते अजय चौधरी आणि शिवसेनेची लीगल सेलची टीमने उपाध्यक्षांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले.

या बारा आमदारांवर होणार कारवाई

एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदीपान भूमरे, भारत गोगवाले, संजय शिरसाठ, यामिनी जाधव, अनिल बाबर, लता सोनावणे, तानाजी सावंत, बालाजी किन्हीकर , प्रकाश सुर्वे, महेश शिंदे या 12 आमदारांवर कारवाईची याचिका करण्यात आली आहे.

बंडखोरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

एकनाथ शिंदेंसहित 11 आमदारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बंडखोर १२ आमदारांना निलंबित करण्याची याचिका शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षाकडे केली आहे. शिवसेनेचे आमदार फोडत वेगळा गट तयार करण्याच्या एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीला हाणून पडण्यासाठी महाविकास आघाडीने एक डाव पुढे केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या वर्षा बंगल्यावर बोलावलेल्या बैठकीत आमदार गैरहजर होते. एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केल्यानंतर नव्याने गटनेते झालेल्या अजय चौधरी यांनी पक्षाचा व्हीप जारी करत वर्षा बंगल्यावर ही बैठक बोलावली होती. मात्र आमदार बैठकीत गैरहजर राहिले. नोटीसला काहींनी तब्येत बरोबर नाही, बाहेर आहे अशी उत्तर दिली. मात्र त्यातील एकनाथ शिंदेंसह 11 आमदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची याचिका विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे करण्यात आली आहे. अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या सह त्या 11 आमदारांना उपाध्यक्ष यांच्या समोर सुनावणीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

सुनावणी दरम्यान या 12 ही आमदारांवर निलंबनाची कारवाई होणार का हा प्रश्न आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या गटातील या एकूण 12 आमदारांचे निलंबन झाले, तर महाविकास आघाडीला कुठलाही धोका राहणार नाही याची काळजी ही महाविकास आघाडीकडून घेण्यात येत असल्याची माहिती आहे. सध्या महाविकास आघाडीकडे 168 इतकं संख्या बळ आहे. त्यात या 12 आमदारांचे निलंबन केले तर 156 आमदारांचे संख्याबळ महाविकास आघाडीकडे राहते जे सत्तेसाठी पुरेसे आहे. तर केवळ निलंबनाची टांगती तलवार एकनाथ शिंदे यांच्या सह या 11 अमदारांवर ठेवत महाविकास आघाडी आपला सत्तेचा दावा कायम ठेवण्याच्या तयारीत ही पाहायला मिळते. आता एकनाथ शिंदे गट नेमकं मुंबईत दाखल होतात का हे ही पाहावे लागेल...

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply