मुंबई : अमित ठाकरेंचा लोकलने प्रवास! अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरमध्ये पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसे नेते अमित ठाकरे महासंपर्क अभियानासाठी अनेक ठिकाणी भेटी देत आहेत. काल त्यांनी पालघर जिल्ह्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यानंतर आज ते अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरमध्ये दौर्‍यावर आहेत. विशेष म्हणजे यावेळी अमित ठाकरेंनी आपली लक्झरी कार सोडून मुंबईच्या लाईफलाईनने म्हणजे लोकलने प्रवास केला आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी अमित ठाकरेंचे लोकलने प्रवास करतानाचे फोटो शेयर केले आहेत. 

राज्याच्या राजकारणात सक्रिय होऊ पाहणारे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे सध्या संघटनात्मक बांधणीवर जास्त लक्षं देतायत. त्यासाठी ते राज्यातील अनेक भागांत फिरतायत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या महासंपर्कअभियानासाठी ते त्यांच्या सहकार्‍यांसोबत लोकलने अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरमध्ये दाखल झाले. कालच (२१ जुलै) अमित ठाकरे यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा केला. पक्ष पुर्नबांधणी करण्यासाठी तसेच स्थानिक समस्या समजून घेण्यासाठी अमित ठाकरे मंगळवारी आणि बुधवारी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आला होता. यामध्ये पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड व वाडा अशा तालुक्यांमध्ये भेट देऊन, तेथील स्थानिकांच्या समस्या समजून घेण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता.

अमित ठाकरे मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या बांधणीवर विशेष लक्ष देत आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा फायदा पक्षाला कसा होऊ शकेल यावर लक्ष केंद्रीत करत तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी मनसेचा गनिमीकावा सुरु आहे. त्यानुसार आजही ते अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काही काळ विश्रांतीचा सल्ला दिला होता. राज ठाकरेंची प्रकृती आता उत्तम असून तेही पक्षाच्या कार्यक्रमांत सक्रिय होत आहेत. काही दिवसांपूर्वी मनसेचे महत्त्वाचे नेते, सरचिटणीस आणि विभाग अध्यक्षांची बैठक मुंबईत झाली, ज्यात त्यांनी मार्गदर्शन केलं होतं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply