मुंबई : अनिल देशमुखांचा जामीन रद्द होणार? CBI ने खेळली नवी चाल; हायकोर्टानेही दिली १० दिवसांची स्थगिती

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज मुंबई हायकोर्टाने सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर केला. मात्र, देशमुखांना जामीन मंजूर होताच, पुढच्याच क्षणी त्यांच्या जामीनाला १० दिवसांची स्थगिती सुद्धा देण्यात आली. कारण, सीबीआयने या जामीनाविरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं हायकोर्टाला सांगितलं. यासाठी १० दिवसांचा स्थगिती या निर्णयावर द्यावी, अशी मागणी सीबीआयने केली. दरम्यान, सीबीआयच्या विनंती मान देऊन न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली.

त्यामुळे अनिल देशमुख यांना आता तुरूंगातून बाहेर येण्यासाठी १० दिवस वाट बघावी लागणार आहे. स्वत: अनिल देशमुख यांच्या वकिलांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. 'सीबीआयच्या मागणीनुसार जामीन मंजूर झाल्याच्या निर्णयाला १० दिवसांची स्थगिती निर्णयाला देण्यात आली आहे, मात्र स्थगिती मिळाली असली तरी सर्वोच्च न्यायालयामध्येही उच्च न्यायालयाचा निकाल कायम राहिल, असा विश्वासही देशमुख यांच्या वकिलांनी व्यक्त केला.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालयाने (ED) त्यांना वर्षभरापूर्वी अटक केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी तुरूंगात करण्यात आली. तेव्हापासून अनिल देशमुख हे आर्थर रोड तुरूंगात होते. मध्यंतरीच्या काळात तुरूंगात त्यांची तब्येत खालावली होती. त्यानंतर देशमुख यांना उपचारासाठी जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, आज मुंबई हायकोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये देशमुख यांना याधीच जामीन मिळालेला आहे. मात्र, सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यांत मुंबई सत्र न्यायालयाने देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अनिल देशमुख यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. याबाबत सुनावणी पूर्ण झाली असून दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी निर्णय राखून ठेवला होता. आज न्यायालयाने यावर निकाल देत अनिल देशमुख यांचा जामीन मंजूर केला. मात्र, सीबीआयच्या विनंतीवरून त्यांना १० दिवसांसाठी त्यांची तुरूंगातून सुटका होणार नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply