मुंबईकरांसाठी खुशखबर! एसी लोकलचे दर कमी होणार, प्रवासी संघटनांकडून केली होती मागणी

मुंबई - राज्यात उष्णतेची लाट वाढत असून मुंबईकर देखील उन्हाळ्यातील उकाड्याने हैराण झाले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी एसी लोकलच्या गारेगार प्रवासाला पसंती दिली आहे. मात्र, गारेगार प्रवास सर्वसाधारण मुंबईकरांच्या खिशाला परवडणारा नसल्याने तिकीट दर कमी करावेत अशी मागणी देखील प्रवासी संघटनांकडूनही केली जात होती. त्यामुळे एसी लोकलचे तिकीट दर आता सर्वसामान्य प्रवाशांच्या आवाक्यात येण्याची शक्यता आहे. कारण मुंबईत एसी लोकलचे दर जवळपास २० ते ३० टक्क्यांनी कमी होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आज मुंबईत एका कार्यक्रमानिमित्त भायखळा रेल्वे स्थानकाला भेट देणार आहेत. याच कार्यक्रमात एसी लोकलचे तिकीट दर कमी करण्याची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल अत्याधुनिक करत पश्चिम आणि मध्य रेल्वेने एसी लोकल सेवा सुरू केली होती. मात्र, एसी लोकलचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नसल्याने प्रवाशांकडून वारंवार तक्रार केली जात होती. उन्हाळ्यात एसी लोकल सेवा प्रवाशांसाठी उपयुक्त ठरत असली तरी तिकीट दर जास्त असल्याने सर्वसामान्य प्रवासी या सेवेचा वापर करू शकत नव्हता. म्हणून एसी लोकलचे तिकीट दर कमी करावेत अशी मागणी प्रवासी संघटनांकडूनही केली जात होती.

मध्य रेल्वेकडून ५ हजार प्रवाशांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यात एसी लोकलबाबत प्रवाशांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी ९८ टक्के प्रवाशांनी एसी लोकलचं तिकीट कमी करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर एसी लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात येण्याची मागणी ९५ टक्के प्रवाशांनी केली, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून देण्यात आली होती. आता याच सर्व मागण्यांचा मागोवा घेत रेल्वे प्रशासनाकडून तिकटी दरात कपात करण्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply