माऊलींच्या पालखीचे मानाचे अश्व सज्ज; हिरा-मोती १८ जूनला पुण्यात

पुणे : दोन वर्षांच्या खंडानंतर निघणाऱ्या पायी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे मानाचे अश्व सज्ज झाले आहेत. कर्नाटकातील बेळगावनजीक असलेल्या अंकली येथून १० जून रोजी हिरा-मोती हे मानाचे अश्वद्वय प्रस्थान ठेवणार आहेत. अकरा दिवसांच्या प्रवासानंतर १८ जून रोजी हिरा-मोती यांचे पुण्यात आगमन होणार आहे.

दोन वर्षांच्या खंडांनंतर आषाढी वारीचा सोहळा यंदा हरीनामाच्या गजरात पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. करोनाचे संकट पूर्णपणे दूर झाले नसले तरी वारीमध्ये खबरदारी घेतली जाणार आहे. या प्रस्थानाचे मानकरी मानले जाणारे माऊलींचे मानाचे अश्वद्वय अंकली येथून १० जून रोजी पुण्याकडे वाटचाल सुरू करणार आहेत. १८ जून रोजी पुण्यात पोहोचल्यावर एक दिवसाचा विश्रांतीचा मुक्काम करून मानाचे अश्व माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी २० जून रोजी आळंदीकडे जातील, अशी माहिती अंकली संस्थानचे उर्जितसिंहराजे शितोळे सरकार आणि महादजीराजे शितोळे यांनी दिली.

अंकली येथील शितोळे सरकारांच्या अश्वांना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या अग्रस्थानाचा मान आहे. दरवर्षी पालखी सोहळ्याच्या १२ दिवस अगोदर मानाचे अश्वद्वय अंकली येथून प्रस्थान ठेवून अंकली ते आळंदी हा ३१५ किलोमीटरचा मार्ग पायी पार करतात. हिरा आणि मोती अशी माऊलींच्या मानाच्या अश्वांची नावे असून त्यांच्यासोबत जरीपटका आणि गादी असते. अश्वांसह त्यांचेही पूजन केले जाते. त्यानंतर गादी अश्वांवर चढवली जाते. मानाचा जरीपटका स्वाराकडे सांभाळण्यासाठी सुपूर्द केला जातो, असे शितोळे सरकार यांनी सांगितले.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply