पुणे : प्रादेशिक समस्यांनुसार मातृभाषेत शिक्षण हवे : सोनम वांगचुक

पुणे : ‘‘शिक्षण देशाच्या गरजेची निगडित व मातृभाषेत हवे. पण आजही आपण इंग्रजीवर भर देत आहोत. प्रत्येक भागाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत तर त्याचे उत्तर देखील वेगळे असेल. त्यामुळे प्रादेशिक समस्या समजून घेत मातृभाषेत शिक्षण असायला हवे. तसेच आपले शिक्षण आणखी अर्थपूर्ण बनविण्याची गरज आहे,’’ असे मत शिक्षणतज्ज्ञ व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी व्यक्त केले.

‘लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट’च्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने वांगचुक यांना मंगळवारी (ता.१२) ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठा’चे कुलपती डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी पुरस्काराला उत्तर देताना वांगचुक यांनी आपले विचार मांडले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला. माजी केंद्रीय गृहमंत्री आणि टिळक स्मारक ट्रस्टचे विश्‍वस्त सुशीलकुमार शिंदे, खासदार रजनी पाटील, टिमवि ट्रस्टचे उपाध्यक्ष रोहित टिळक, विश्‍वस्त डॉ. प्रणती टिळक, प्रभारी कुलगुरू डॉ. गीताली टिळक-मोने आणि अभिनेता ओमी वैद्य यावेळी उपस्थित होते. टिळक महाराष्ट्र विद्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन यावेळी वांगचुक यांच्या हस्ते करण्यात आले.

वांगचुक म्हणाले, ‘‘ स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना पुढील २५ वर्षांत देखील विचार करायला हवा. देशाच्या स्वातंत्र्याला २५ वर्षांनी शतक पूर्ण होतेय. तोपर्यंत आपण विश्वगुरू म्हणून उदयाला यायला हवे. तसेच जगाच्या आकाशात आपले अस्थीत्व आणखी मजबूत व्हावे.’’

शिंदे म्हणाले, ‘‘शिक्षणाची नस पकडून समाजाचे प्रश्न हाताळावे लागतील हे टिळक-आगरकर यांनी सांगितले होते. त्यांचे विचार पूर्ण करणे हीच त्यांना श्रद्धांजली असेल. टिळकांनी शिक्षणाचा पाया घातला होता. तो वांगचुक यांनी मनापासून स्वीकारला आहे.

वांगचुक यांनी डोंगराळ भागात शिक्षणाचा यज्ञ पोचवला. तो सर्व उत्तर भारतात पसरला पाहिजे. लडाख परिसरातील विद्यार्थ्यांत राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचे काम याच ऋषीने केले पाहिजे.’’

पाटील म्हणाल्या, ‘‘ टिळकांचे पुणे आहे हे सांगायला अभिमान वाटले. टिमविने राज्य घडवले आहे. बाजारूपणा न करता विद्यापीठाने शिक्षणाचा दर्जा कायम ठेवला. वैद्य, रोहित टिळक व इतर मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रस्तावित डॉ. दीपक टिळक यांनी केले. पुरस्कारामागील भूमिका त्यांनी स्पष्ट केली. तसेच विद्यापीठाच्या कामाची माहिती दिली. विनोद सातव यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रिटिश काळात आपण राजकीय आणि मानसिक गुलाम होतो. त्यामुळे स्वदेशी वस्तूंना भाव नव्हता. आता देखील तीच स्थिती आहे. आपण आजही चीनमधून वस्तू आणत आहेत. लोकमान्य टिळक यांनी दिलेल्या स्वदेशीच्या नाऱ्याचे संदर्भ सध्या बदलले आहेत. पण स्वदेशीची आज देखील गरज आहे. नाहीतर आपण पुन्हा गुलामीच्या साखळीत अडकले जाऊ. आपल्याकडे निर्माण होत असलेल्या वस्तूंना मूल्य द्या व आयातीवर बहिष्कार घाला,’’ असा आवाहन यावेळी वांगचुक यांनी केले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply