प्रवीण चव्हाण यांच्याकडून माझी बदनामी, मला अडकविण्याचा प्रयत्न – तेजस मोरे

पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरकारी वकील प्रवीण चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्यातील संभाषण उघड करणाऱ्या पेनड्रॉईव्ह प्रकरणामध्ये चव्हाण यांनी तेजस मोरे या व्यक्तीनेच "स्टिंग ऑपरेशन' केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणावरुन मोरे यांनी आता थेट चव्हाण यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. "चव्हाण यांनी खोटे आरोप करून आपली बदनामी केली आहे. त्यांनीच माझी फसवणूक केली आहे.' असा उल्लेख मोरे यांनी आपल्या तक्रार अर्जामध्ये केला आहे. भाजपचे गिरीश महाजन यांच्यासह काही नेत्यांना पुणे पोलिसांकडून अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल फडणवीस यांनी विधानसभेमध्ये आवाज उठविला होता. त्याचबरोबर फडणवीस यांनी सरकारी वकील प्रवीण चव्हाण, पुणे पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्यास अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे संभाषण असलेला पेनड्राईव्ह विधानसभेत सादर केला होता. त्यावरुन मोठ्या प्रमाणात गदारोळ उठला होता. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणाची दखल घेऊन चौकशी करु, असे स्पष्ट केले होते. दरम्यान, चव्हाण यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये तेजस मोरे नावाच्या व्यक्तीने घड्याळ बसविले, त्यातील कॅमेऱ्याने चित्रीकरण केले, मात्र तसे संभाषण नसल्याचे सांगितले होते. दरम्यान, मोरे यांनी देखील पुढे येऊन चव्हाण यांच्यावर आरोप केले होते. दरम्यान, चव्हाण यांच्याकडूनही तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु होती. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. मोरे यांनी त्यांच्याविरुद्ध चव्हाण यांनी केलेले आरोप खोडून काढले आहेत. मोरे यांच्या वकीलाने शनिवारी सायंकाळी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. त्यामध्ये '' चव्हाण यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. त्यामुळे माझी बदनामी झाली आहे. चव्हाण यांनीच माझी फसवणूक केली आहे.'' असे संबंधित तक्रार अर्जामध्ये नमूद करण्यात आले आहे. ""तेजस मोरे यांच्या वकीलाने शनिवारी सायंकाळी आमच्याकडे तक्रार अर्ज केला आहे. संबंधित अर्जाची चौकशी केली जाईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल.''अनिता मोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर पोलिस ठाणे.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply