पुण्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते भव्य ‘जीतो कनेक्ट’चे उद्घाटन

पुण्यात जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जीतो पुणे) वतीने ‘जीतो कनेक्ट २०२२’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने येत्या ६ ते ८ मे दरम्यान ही परिषद पुण्यात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (६ मे) रोजी दृकश्राव्य माध्यमाद्वारे या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तीन दिवसांच्या या परिषदेमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित ७६ वक्ते सहभागी होणार आहेत. व्यापार, उद्योग, प्रेरणा, फॅशन, अर्थकारण, स्टार्टअप इत्यादी अनेक विषयांवर व्याख्याने, चर्चासत्र, कार्यशाळा होणार आहेत. तसेच, ट्रेड फेअर आणि जैन धर्माची परंपरेचे दर्शन घडविणारे जैन पॅव्हेलियन यांचाही यामध्ये समावेश असणार आहे

जीतो अॅपेक्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, जीतो पुणेचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका आणि जीतो कनेक्टचे समन्वयक राजेश सांकला यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी जीतो पुणेचे मुख्य सचिव पंकज कर्नावट, सचिव चेतन भंडारी, जीतो रेस्ट ऑफ महाराष्ट्र झोनचे अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, जीतो अपेक्सचे संचालक रमेश गांधी, इंदर छाजेड, जीतो रेस्ट ऑफ महाराष्ट्र झोन जेएटीएफचे अध्यक्ष इंदर जैन, अजय मेहता, हितेश शहा, जीतो युथ विंग पुणेचे अध्यक्ष गौरव नहार आदी मान्यवर उपस्थित होते.

तीन दिवसांच्या या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, प्रसिद्ध कवी कुमार विश्वास, प्रसिद्ध गायक सोनु निगम, प्रेरणादायी वक्ते विवेक बिंद्रा, गौर गोपाल दास आणि उद्योग व व्यापार क्षेत्राशी निगडीत अनेक मान्यवर वक्त्यांची उपस्थिती लाभणार आहे.

एकत्र येऊन उद्याचे उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या दृष्टीकोनातून जीतो संस्था काम करते. जीतो पुणेच्या वतीने २०१६ मध्ये जीतो कनेक्टचं पहिल्यांदा आयोजन करण्यात आले होते. ‘जीतो कनेक्ट २०२२’ ही मागच्यापेक्षाही मोठी परिषद असणार आहे. ५ लाखांहून अधिक उद्योजक व व्यापाऱ्यांची उपस्थिती यावेळी अपेक्षित आहे. पुणे शहरातील गंगाधाम चौक ते कात्रज कोंढवा रस्त्यावरील राजयोग लॉन्स येथे ही आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे.

सुमारे १५ लाख चौरस हेक्टर जागेत परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. ४० हजार चौरस फुटांत जैन पॅव्हेलियन असणार आहे. याठिकाणी ६५०० बैठक व्यवस्था असलेले एक मुख्य सभागृह आणि ६०० बैठक व्यवस्था असलेले तीन सभागृह असणार आहेत. मुख्य सभागृहात उद्घाटन व समारोप कार्यक्रमाबरोबरच जगभरातून आलेल्या महत्वाच्या व्याख्यात्यांची व्याख्याने होणार आहेत. तर, इतर तीन सभागृहात विविध विषयांवरील कार्यशाळा व चर्चासत्र होणार आहेत.

१ लाखाहून अधिक वस्तू सेवा देणारे ५ लाखाहून अधिक उद्योजक सहभागी होणार

या आंतरराष्ट्रीय परिषदेत बीटुबी पॅव्हेलियन, स्मार्ट टेक पॅव्हेलियन, जीतो बिझनेस कोर्ट पॅव्हेलियन, लाईफस्टाईल अॅण्ड ज्वेलरी पॅव्हेलियन, एज्युकेशन अॅण्ड सायन्स पार्क आणि बीटूसी पॅव्हेलियन असणार आहे. या परिषदेत होणाऱ्या प्रदर्शनात एक हजारांहून अधिक कंपन्या सहभागी होणार असून त्यांच्या एक लाखाहून अधिक वस्तु व सेवांचा सहभाग असणार आहे. तसेच, या परिषदेसाठी मोफत प्रवेश असून ५ लाखाहून अधिक उद्योजक व व्यापारी याठिकाणी येतील असा अंदाज आहे. येणाऱ्या प्रत्येकासाठी व्यवस्था व्हावी म्हणून गाडी पार्किंगची २.२५ लाख चौरस फूट जागेत व्यवस्था करण्यात आली आहे.   जगाचा शाश्वत विकास करु शकणाऱ्या कल्पना आणि विचारांना उद्योग व व्यापारामध्ये परावर्तीत करण्याच्या दृष्टीकोनातून या परिषदेत अत्यंत महत्वपूर्ण चर्चा होणार आहे. सर्व स्तरातील उद्योजक व व्यापारी, तरुण उद्योजक, महिला उद्योजक, पालक आणि १४ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ही परिषद महत्वपूर्ण ठरणार आहे. 

उपस्थित राहण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक

या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या यशस्वीतेसाठी अनेकांनी सहकार्य व योगदान दिले आहे. प्रशासन, पोलीस आणि स्थानिक नागरिकांचे सहकार्य लाभले आहे. करोनाच्या काळात आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरणार आहे. या परिषदेमध्ये होत असलेल्या कार्यक्रमांना प्रवेश मोफत आहे. मात्र, जागेची मर्यादा लक्षात घेता त्यासाठी उपस्थित राहण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नाव नोंदणी connect2022.jito.org या संकेतस्थळावर जाऊन करता येईल.

‘जीतो कनेक्ट २०२२’ आंतरराष्ट्रीय परिषदेतील विविध विभाग

१. बीटूबी पॅव्हेलियन

यामध्ये दोन विभाग करण्यात आले असून मोठ्या उद्योगांसाठी आणि एसएमई साठी स्वतंत्र बीटूबी पॅव्हेलियन करण्यात आले आहे.

२. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क

तंत्रज्ञानाशी निगडीत उद्योग व व्यावसायिकांना यामध्ये विशेष स्थान देण्यात आले आहे. चर्चासत्र, व्याख्याने यामाध्यमातून अधिकाधिक माहिती देण्याचा प्रयत्न याठिकाणी होणार आहे.

३. स्टार्ट अप

विविध क्षेत्रातील स्टार्ट अपचा स्वतंत्र कक्ष यामध्ये असणार आहे.

४. बीटूसी पॅव्हेलियन

थेट ग्राहकांशी संबंधित असलेल्या व्यवसाय व उद्योगांना यामध्ये प्रोत्साहन देण्यात आले आहे. विविध ब्रँड्स, नवीन उत्पादनांच्या विक्रीबरोबरच ग्राहकांशी नाते वाढविण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

५. बिझनेस कोर्ट

प्लास्टिक, पॅकेजिंग, इन्फ्रा व रियल इस्टेट, सरकारी टेंडर्स आणि फ्रँचाईजी मॉडेल क्षेत्रातील संधी विषयी

६. ज्वेलरी पॅव्हेलियन

हे प्रदर्शन सप्ततारांकित असणार आहे. यामध्ये हिरे व ज्वेलरीमधील देशातील सर्व नामांकित ब्रँड्स सहभागी झाले आहेत.

७. जैन पॅव्हेलियन

जैन धर्माचं तत्वज्ञान सांगणारं हे पॅव्हेलियन अतिशय मनमोहक आणि वैशिष्टपूर्ण तयार करणात आलं आहे. जैन धर्मियांबरोबरच इतर धर्मातील नागरिकांनीही या पॅव्हेलियनला भेट देऊन जैन धर्मातील वर्धमान महावीर यांनी सांगितलेल्या अहिंसा परमो धर्म तत्वज्ञानाला समजून घेता येणार आहे. यात जैन मंदिराची आर्ट गॅलरी, कर्म म्हणजे काय? याचे प्रात्यक्षिक, जैन धर्मग्रंथ व हस्तलिखितांचे प्रदर्शन, जैन तीर्थंकरांच्या स्फटिकांमधील मूर्ती, श्रुत भवनची मूळ आवृत्ती, महात्मा गांधींना अहिंसेचा मार्ग दाखवणारे जैन तत्वज्ञ श्रीमद राजचंद्र यांच्याविषयी माहिती याचा समावेश असेल.

तीन दिवसांच्या या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित वक्ते सहभागी होणार आहेत. यामध्ये नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत, प्रेरणादायी वक्ते विवेक बिंद्रा व गौर गोपाल दास, मोतीलाल ओसवाल, शार्क टँक शोमधील नमिता थापर आदींचा समावेश आहे. विदेशातील व्यापार व उद्योगातील संधीबाबत सात देशांचे राजदूत या परिषदेत बोलणार आहेत. याबरोबरच प्रसिद्ध गायक सोनु निगम, पलक मुच्छाल व पलाश मुच्छाल यांचा कार्यक्रम होणार आहे.

.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply