पुणे : २०० कोटींच्या वसुलीचे आरोप करणाऱ्या व्हायरल पत्रावर IPS कृष्ण प्रकाश यांची पहिली प्रतिक्रिया,

पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर २०० कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप करणारं पत्र व्हायरल झालं. यानंतर सध्या मुंबईचे पोलीस महानिरीक्षक म्हणून काम करत असलेल्या कृष्ण प्रकाश यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय. यात त्यांनी संबंधित पत्र खोटं असल्याचं म्हटलंय. तसेच आपल्या विरोधात काही व्यक्तींनी षडयंत्र केल्याचा आरोपही केलाय. दुसरीकडे आरोप करण्यात आलेल्या पत्रावर ज्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे त्या अधिकाऱ्याने देखील आपलं नाव वापरून खोटी सही करून पोलीस विभागाची बदनामी केल्याची तक्रार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे केलीय. या आरोपांवर बोलताना कृष्ण प्रकाश म्हणाले, “माझ्यावरील आरोप हे काही व्यक्तींनी केलेलं षडयंत्र आहे. मी चुकीचं काहीही केलेलं नाही. हे पत्र खोटं आहे. पत्र खोटं असल्याचं एपीआय अशोक डोंगरे यांनी देखील सांगितलं आहे. तशी तक्रार केली आहे.” दुसरीकडे व्हायरल पत्राद्वारे ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने कृष्ण प्रकाश यांच्यावर २०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप करण्यात आले त्या अधिकाऱ्याने हे पत्र खोटं असल्याचं, आपल्या नावाचा गैरवापर करून खोटी सही केल्याचा आरोप केलाय. तसेच याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केलीय. सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटलं आहे, “आज (६ मे) सकाळी ८ वाजता पिंपरी पोलीस ठाणे येथे बंदोबस्तासाठी असताना मला व्हॉट्सअॅपवर एक चार पानी पत्र वाचण्यास मिळालं. या पत्रात पिंपरी चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा ‘रीडर’ म्हणून काम करत असताना काही पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उल्लेख करून खोटे आरोप करण्यात आले.” “या पत्रात माझे नाव वापरून खोटी सही करून खोटे आरोप करण्यात आले आहेत. यातून माझी व तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची प्रतिमा मलिन करण्याचा आणि बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. यामुळे पोलीस दलाची प्रतिमा खराब झाली आहे. त्यामुळे अशाप्रकारे कुटील डाव करून बदनामी करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी,” अशी विनंती पोलीस अधिकारी डोंगरे यांनी केली.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply