पुणे : सुट्टे पैसे न दिल्याच्या रागातून कोयते, रॉडने केली किराणा दुकानाची तोडफोड

पुणे : सिंहगड - सुट्टे पैसे न दिल्याच्या रागातून खानापूर (ता. हवेली) येथे सराईत गुन्हेगारांनी कोयते व लोखंडी रॉडने किराणा दुकानदाराला धमकावत तोडफोड केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रितेश भोसले (वय 23, रा. खानापूर) या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून इतर पाच ते सहा आरोपी फरार झाले आहेत. यात काही आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती हवेली पोलीसांनी दिली आहे.

चेतन संभाजी जावळकर यांचे खानापूर येथे गोकुळ सुपर मार्केट या नावाने किराणा मालाचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी एक आरोपी पाचशे रुपये सुट्टे मागण्यासाठी आला असता चेतन जावळकर त्याला सुट्टे पैसे नाहीत असे म्हणाले होते. तेव्हा आरोपी तुला दाखवतो म्हणून निघून गेला. दि. 3 जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास रितेश भोसले व इतर पाच ते सहा जण हातात कोयते, रॉड, दारुच्या बाटल्या घेऊन जावळकर यांच्या दुकानासमोर गेले.

आरोपींनी किराणा दुकानातील कामगार सुराराम चौधरी याला धमकावत दुकानातील काचा व शटरची तोडफोड केली. चेतन जावळकर यांनी याबाबत हवेली पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसह खानापूर येथे दाखल झाले होते. यातील मुख्य आरोपी रितेश भोसले याला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे याबाबत अधिक तपास करत आहेत.

झपाट्याने वाढत असलेले शहरीकरण आणि त्यामुळे वाढलेली स्थलांतरित मजुरांची संख्या यांमुळे हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. खुन,खुनाचा प्रयत्न, चोरी, दहशत निर्माण करणे, बेकायदा घातक शस्त्रे बाळगणे अशा गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांचा सहभाग दिसून येत आहे. नशेच्या आहारी जाऊन अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत असल्याचे चिंताजनक वास्तव दिसत आहे. कायद्यातील तरतुदींमुळे असे अल्पवयीन गुन्हेगार सुटत असल्याने काही गुन्हेगारी टोळ्या जाणीवपूर्वक त्यांचा वापर करत आहेत. त्यामुळे अशा अल्पवयीन गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply