पुणे : शहरात तीन ठिकाणी आग ; रविवार पेठ, नेहरु रस्ता, हडपसर भागात आगीच्या घटना

पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागात तीन ठिकाणी आग लागल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

नेहरू रस्त्यावरील अप्सरा चित्रपटगृहाजवळ सायंकाळी नाल्यातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. नाल्यात साठलेला कचरा पेटल्याने आग लागल्याचे जवानांच्या लक्षात आले. अग्निशमन अधिकारी प्रशांत गायकर आणि जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी दिली. सायंकाळी सव्वासातच्या सुमारास हडपसर भागातील चिंतामणी नगर परिसरात एका गादी कारखान्यात आग लागली. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रमोद सोनवणे आणि जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीचे कारण समजू शकलेले नाही.

रविवार पेठेतील तांबोळी मशिदीजवळ तारा माॅल येथे आग लागल्याची माहिती मिळाली. सात मजली इमारतीत आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. तारा माॅलच्या इमारतीच्या छतावर ठेवलेल्या रिकाम्या प्लास्टिक टाकीला आग लागल्याचे जवानांच्या निदर्शनास आले. जवानांनी पाण्याचा मारा करुन दहा मिनिटात आग आटोक्यात आणली. आग वेळीच नियंत्रणात आल्याने अनर्थ टळला. अग्निशमन दलाचे अधिकारी पंकज जगताप. प्रशांत गायकर जवानांनी आग आटोक्यात आणली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply