पुणे : वेलकम 2023! 31 डिसेंबरला पुण्यात तीन हजार पोलीस तैनात; गडकिल्ल्यांवरही बंदी

पुण्यात सगळीकडे नववर्षाच्या स्वागतासाठी तयारी सुरु झाली आहे. यंदा दोन वर्षांनी मोठ्या उत्साहात नववर्ष साजरं होणार आहे. याच उत्साहाला गालबोट लागू नये म्हणून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी नियोजन सुरु केलं. 31 डिसेंबरला रात्री सुमारे तीन हजार पोलीस तैनात असणार आहेत. त्यामुळे सगळीकडे पोलिसांची करडी नजर असणार आहे. 

31 डिसेंबरला अनेक तरुण नववर्ष साजरं करण्यासाठी रस्त्यावर उतरतात. विविध रेस्टॉरंट आणि खासगी रिसॉर्टमध्ये अनेकांनी पार्टी आणि सेलिब्रेशनचं नियोजन केलं आहे. याशिवाय पुण्यातील अनेक रस्त्यांवर तरुणाई गर्दी करते. यंदा 31 साजरा करण्यासाठी मोठी मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे हुल्लडबाजी करणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात येणार आहे. शहरात 'ड्रंक अँड ड्राइव्ह' विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याने तरुणांना गाडी चालवताना काळजी घ्यावी लागणार आहे.

प्रमुख मार्गांवर नाकाबंदी 'थर्टी फस्ट'च्या रात्री विविध भागांतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शहरातून बाहेर जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावर नाकाबंदी करण्यात येणार आहे. नागरिकांना आक्षेपार्ह घटना अथवा काही संशय असल्यास 26126296, 8975953100  किंवा 112 या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन पोलिसांनी केले आहे. 

गडकिल्ल्यांवर बंदी

नवीन वर्ष साजरं करण्यासाठी अनेक अतिउत्साही पुण्यातील सर्व टेकड्या आणि किल्ल्यांवर गर्दी करतात. रात्रीदेखील मुक्काम ठोकतात. त्यामुळे या अतिउत्साही लोकांना आळा घालण्यासाठी वनक्षेत्राच्या परिसरात आणि गडकिल्ल्यांवर बंदी घालण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी या परिसरात पोलीस देखील तैनात करण्यात आले आहेत. 

फर्ग्युसन रोड आणि महात्मा गांधी रोड बंद

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता (एफसी रोड) आणि महात्मा गांधी रस्ता (एमजी रोड) वाहनांसाठी बंद राहणार आहे. थर्टी फर्स्टच्या रात्री गर्दीचा आढावा घेऊन वाहनांसाठी हा रस्ता बंद करण्यात येणार आहे. एफसी रोड आणि एमजी रोड या दोन्ही रस्त्यांवर 31 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात तरुणाई एकत्र येते. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. यामुळे हे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. 

वाहतुकीत बदल

- महात्मा गांधी रस्त्यावरील वाहतूक 15 ऑगस्ट चौकातून कुरेशी मशीदमार्गे वळवण्यात येणार आहे. 
- इस्कॉन मंदिराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि अरोरा टॉवरकडे जाता येणार नाही आहे.
- व्होल्गा चौकातून महंमद रफी चौककडे वाहतूक बंद असणार आहे.
- इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद असणार आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply