पुणे : वीरयोद्ध्याकडून नागरिकांनी अनुभवला कारगिल युद्धाचा थरार

पुणे : कारगिल युद्धात सतरा हजार फुटांवरील टायगर हिल या बर्फाच्छादित टेकडीवर अठरा गोळ्या शरीरावर झेलून रक्तबंबाळ झाल्यानंतरही विजयश्री खेचून आणणारे परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर योगेंद्रसिंह यादव यांच्या तोंडून कारगिल युद्धाची गोष्ट ऐकण्याचा रोमहर्षक अनुभव नागरिकांनी घेतला.

निमित्त होते असीम फाउंडेशनच्या राष्ट्रीय एकात्मता उद्यानातील एका विशेष कार्यक्रमाचे. सुभेदार मेजर योगेंद्रसिंह यादव यांनी नुकतीच या स्मारकाला भेट दिली. या वेळी असीम फाउंडेशनचे प्रमुख सारंग गोसावी यांनी मेजर यादव यांच्याशी संवाद साधला. निवृत्त लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर, गंगोत्री होम्सचे गणेश जाधव आणि राजेंद्र आवटे या वेळी उपस्थित होते.

वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी कारगिल युद्धात स्वत:च्या प्राणांची बाजी देऊन लढलेले सुभेदार मेजर योगेंद्रसिंह यादव म्हणाले, वडील सैन्यदलात असल्याने त्यांच्याकडून ऐकलेल्या युद्धकथांमुळे मला लष्करात दाखल होण्याची प्रेरणा मिळाली. अठरा ग्रेनेडियर्स या घातक प्लॅटूनमध्ये ते कार्यरत होते. टायगर हिलजवळ काही सहकाऱ्यांसह सुमारे ७२ तास ते अन्न पाण्याशिवाय अहोरात्र लढत होते. या वेळी पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात त्यांचे अनेक सहकारी त्यांच्या डोळ्यांसमोर शहीद झाले. त्यांनाही १८ ते १९ गोळ्या लागल्या. त्यापैकी काही गोळ्या छातीवर लागल्या, मात्र गणवेशाच्या वरच्या खिशातील पाच रुपयांच्या नाण्यांमुळे आपला जीव वाचला, असे मेजर यादव यांनी सांगितले.

मरणासन्न अवस्थेत असताना पाकिस्तानी सैनिक टायगर हिलच्या खालच्या टप्प्यावर असणाऱ्या भारतीय सैनिकांच्या तुकडीवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे ऐकून त्यांनी ही माहिती अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली. त्यामुळे, तातडीने कार्यवाही करून भारतीय अधिकारी टायगर हिलवर चढाई करून ते जिंकू शकले. सुभेदार मेजर यादव यांच्या याच पराक्रमाची दखल घेऊन त्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. या घडामोडी यादव यांच्या तोंडून ऐकणे उपस्थितांसाठी हा रोमहर्षक अनुभव ठरला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply