पुणे – वडगाव शिंदे ते वाघोली रस्ता होणार ‘पीपीपी’द्वारे

पुणे - खराडी ते मांजरी खुर्द या दरम्यानचा सुमारे २.३ किलोमीटर लांबीचा रस्ता आणि वडगाव शिंदे ते वाघोली दरम्यानचा ७.७ किलोमीटर लांबीचा विकास आराखड्यातील रस्ता खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) (PPP) विकसित करण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) (PMRDA) घेतला आहे. त्यांच्या मोबदल्यात विकसनकर्त्याला ‘पीएमआरडीए’कडून रोख मोबदल्याऐवजी ‘क्रेडिट नोट’च्या (विकसन शुल्कात सवलत) स्वरूपात मोबदला देण्यात येणार आहे. प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर प्रथमच अशा प्रकारे रस्ता विकसन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

पीएमआरडीएकडून प्रारूप विकास आराखड्यात खराडी ते मांजरी खुर्द हा ३० मीटर रूदींचा रस्ता दर्शविण्यात आला आहे. हा रस्ता पीपीपी तत्त्वावर विकसित करण्यासाठी पीएमआरडीएकडून ऑनलाइन निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या रस्त्यासाठी अंदाजे ९ कोटी २७ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. ३० मीटर रुंदीच्या रस्त्यापैकी १८ मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम विकसकाने स्वखर्चातून करून द्यावयाचा आहे तर उर्वरित १२ मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम हे ‘पीएमआरडीए’कडून करण्यात येणार आहे. या रस्त्यासाठीची शंभर टक्के जागा पीएमआरडीएच्या ताब्यात आल्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मांजरी खुर्द येथील नागरिकांना पुण्यात अथवा खराडीला जाण्यासाठी सध्या सोलापूर रस्त्याने हडपसरला यावे लागते. त्यामुळे हे अंतर लांब पडते. हा रस्ता विकसित झाल्यानंतर मांजरी खुर्दवरून दहा मिनिटात खराडीला येता येणार आहे. खराडीवरून पुण्यात येणे सोयीचे ठरणार आहे. या रस्त्यामुळे मांजरी खुर्दमधील रहिवाशांच्या वेळेत जवळपास अर्धा तासांनी बचत होणार आहे. तसेच या रस्त्यामुळे वाहतुकीचा ताण कमी होण्यासदेखील मदत होणार आहे.

वडगाव शिंदे ते वाघोली दरम्यानच्या ७.७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यामुळे नाशिक आणि नगरकडे जाणारी वाहने परस्पर जाणार आहेत. सध्या या वाहनांना पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करून जावे लागते. हा रस्ता विकसित झाल्यानंतर शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. ‘पीएमआरडीए’कडून हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडमध्ये देखील या रस्त्याचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड मधील स्पाईन रोडच्या पुढील टप्पा म्हणजे हा रस्ता आहे. चऱ्होलीपासून वडगाव शिंदे-लोहगावमार्गे वाघोलीपर्यंत हा रस्ता जाणार आहे. यामुळे नगरवरून नाशिकला जाणाऱ्या आणि नाशिकवरून नगरकडे जाणाऱ्या वाहनांना थेट जाता येणार आहे.

पीएमआरडीएकडून पहिल्या टप्प्यात मांजरी खराडी ते मांजरी खुर्द दरम्यानचा रस्ता विकसित करण्याचे काम पीपीपीवर हाती घेण्यात आले आहे. त्यांच्या ऑनलाइन निविदाही काढण्यात आल्या आहेत. त्यानंतर वडगावशिंदे ते वाघोली दरम्यानच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या रस्त्यांमुळे शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply