पुणे : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात सहा ठिकाणी आग ; घोरपडीतील सोसायटीमध्ये आठ दुचाकी पेटल्या

पुणे : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात आली. शहरातील सहा ठिकाणी फटाक्यांमुळे आगी लागल्याच्या घटना घडल्या. घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावरील एका सोसायटीतील आठ दुचाकींनी पेट घेतल्या. रात्री उशीरापर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागात फटाक्यांमुळे आग लागण्याच्या किरकोळ घटना घडल्याने अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ उडाली.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी सातनंतर शहरात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी सुरू झाली. आतषबाजीमुळे आसमंत उजळून निघाला होता. पर्वती पायथा परिसरातील जनता वसाहतीत गल्ली क्रमांक ४७ येथे एका झाडाला फटाक्यांमुळे आग लागली. कात्रजमधील आंबेगाव पठार येथील साईसिद्धी चौकात आग लागल्याची घटना घडली. सोसायटीतील सदनिकेच्या गॅलरीत ठेवलेल्या साहित्यावर फटाक्यांची ठिणगी पडल्याने आग लागली.

रात्री साडेआठच्या सुमारास घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर बिटाटेल एनक्लेव्ह सोसायटीत फटाक्यांमुळे आग लागली. फटाक्यांमुळे पार्किंगमधील आठ दुचाकी पेटल्या. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी घेऊन आग आटोक्यात आणली. सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागात मानाजीनगर येथे ज्ञानदीप शाळेच्या छतावर पडलेल्या पालापाचोळ्याने पेट घेतला. विश्रांतवाडीतील सिरीन हाॅस्पिटलसमोर पेटता फटाक्यामुळे झाडाला आग लागली. वारजे माळवाडीत चैतन्य चोैकातील युनिव्हर्सल सोसायटीत एका बंद सदनिकेत आग लागली.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी शहरात फटाक्यांमुळे एकापाठोपाठ आग लागण्याच्या घटना घडल्या. सायंकाळी सात ते रात्री नऊ दरम्यान सहा ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

अग्निशमन दलाचे सहायक विभागीय अधिकारी रमेश गांगड, वाहनचालक शाहनवाज सय्यद सोमवारी दुपारी वाहनातून धानोरी परिसरातून जात होते. त्या वेलळी एका रिक्षाच्या सीएनजी टाकीतून गळती होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सय्यद यांनी प्रसंगावधान राखून रिक्षात ठेवलेली फटाक्यांची पिशवी बाहेर काढली. रिक्षातून सीएनजी गळती झाल्यानंतर रिक्षाचालक आणि प्रवासी बाहेर उतरले होते. या घटनेमुळे धानोरी रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. गांगड आणि सय्यद यांनी रस्त्यातील रिक्षा रस्त्याच्या कडेला नेली. रिक्षात आग लागली नसल्याची खात्री केली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply