पुणे : राहुल गांधी यांचा अग्निपथ योजनेला विरोध, तरुणांची अग्निपरीक्षा घेऊ नका म्हणत मोदी सरकारवर टीका

पुणे : केंद्र सरकारने लष्कर, नौदल आणि वायुदलातील सैनिक भरतीसाठी अग्निपथ नावाची योजना आणली आहे. या योजनेंतर्गत युवकांना संरक्षण दलांत चार वर्षे ‘अग्निवीर’ म्हणून सेवा करण्याची संधी मिळेल असे भारत सरकारने सांगितले आहे. मात्र या योजनेला देशातील वेगवेगळ्या भागातून विरोध होत आहे. बिहार तसेच इतर राज्यांत या योजनेविरोधात जोरदार निदर्शने केली जात असून काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. असे असताना आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी अग्निपथ या योजनेचा विरोध केला असून तरुणांच्या भविष्याशी खेळू नका असा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे. त्यांनी अग्निपथ या योजनेला कडाडून विरोध केला आहे.

राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे अग्निपथ या योजनेला विरोध करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. “दोन वर्षांपासून सरळ भरती करण्यात आलेली नाही. चार वर्षानंतर युवकांचे भविष्य अस्थिर होईल. तसेच या काळात कोणताही रँक मिळणार नाही. तसेच कोणतेही पेंशनदेखील मिळणार नाही. सरकारकडून संरक्षण दलाच सन्मान केला जात नाहीये,” असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे. तसेच देशातील बेरोजगार युवकांचे म्हणणे ऐकायला हवे. त्यांना अग्निपथावर चालवून त्यांच्या संयमाची अग्निपरीक्षा घेऊन नका, असा इशारादेखील राहुल गांधी यांनी दिला आहे.

मोदी सरकारच्या अग्निपथ या योजनेला देशाच्या वेगवेगळ्या भागातून कडाडून विरोध केला जातोय. बिहारमध्ये लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी आंदोलन केले आहे. या आंदोलनादरम्यान रेल्वेची जाळपोळ करण्यात आली आहे. तसेच तरुणांनी भभुआ रेल्वे स्थानकावर इंटरसिटी एक्स्प्रेस रेल्वेवर दगडफेक केली आहे. दुसरीकडे जयपूरमध्ये १५० लोकांनी अजमेर-दिल्ली हायवे रोखून धरला होता. येथे पोलिसांनी १० आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं.

दरम्यान, या योजनेंतर्गत युवकांना संरक्षण दलांत चार वर्षे ‘अग्निवीर’ म्हणून सेवेची संधी मिळेल. या योजनेद्वारे भरतीमुळे व्यापक स्तरावर प्रतिभावान सैनिक संरक्षण दलांना मिळतील, असा दावा मोदी सरकारकडून केला जातोय. या योजनेंतर्गत या वर्षी यंदा ४६,००० जणांची अग्निवीर म्हणून भरती केली जाईल. ही भरती तीन महिन्यांतच सुरु होणार आहे. त्यासाठी साडेसतरा ते २१ ही वयोमर्यादा असेल. पहिल्या वर्षी अग्निवीरांना मासिक ३० हजार रुपये मोबदला मिळेल. त्यांना दुसऱ्या वर्षी ३३,०००, तिसऱ्या वर्षी ३६,५०० आणि चौथ्या वर्षी ४०,००० मोबदला मिळणार आहे. प्रत्येक अग्निवीराला ११.७१ लाख सेवानिधी मिळणार असून, हे उत्पन्न करमुक्त असेल. शिवाय, त्यांना सेवाकाळात ४८ लाखांचे विमाकवच मिळणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply