पुणे : राज्यातील पाच उच्च शिक्षण संस्थांना जागतिक विद्यापीठ क्रमवारीत स्थान ; टाइम्स हायर एज्युकेशनतर्फे जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२३ जाहीर

पुणे : टाइम्स हायर एज्युकेशनतर्फे जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२३ जाहीर करण्यात आली. क्रमवारीतील पहिल्या पाचशे विद्यापीठांमध्ये देशातील केवळ पाच संस्थांनाच स्थान मिळवता आले आहे. तर राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, (आयसीटी) भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर पुणे), पुण्यातील सिम्बायोसिस आंतराष्ट्रीय विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ यांचा पहिल्या दीड हजार उच्च शिक्षण संस्थांमध्ये समावेश आहे.

टाइम्स हायर एज्युकेशनची जागतिक विद्यापीठ क्रमवारी ही प्रतिष्ठेची मानली जाते. यंदा या क्रमवारीसाठी १०४ देशांतील १ हजार ७९९ विद्यापीठांनी सहभाग घेतला. क्रमवारीमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ पहिल्या स्थानी, हार्वर्ड विद्यापीठ दुसऱ्या स्थानी आणि केंब्रिज विद्यापीठ आणि स्टॅनफर्ड विद्यापीठ संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी आहेत. बेंगळुरूची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही देशातील एकमेव संस्था पहिल्या ३५० संस्थांमध्ये स्थान मिळवू शकली. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्ससह जेएसएस ॲकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रीसर्च, शूलिनी जैवतंत्रज्ञान आणि व्यवस्थापनशास्त्र विद्यापीठ, अलगप्पा विद्यापीठ, महात्मा गांधी विद्यापीठ या पाच संस्थांनाच पहिल्या पाचशे संस्थांमध्ये स्थान मिळाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे स्थान गेल्या वर्षीच्या तुलनेत उंचावले.

गेल्यावर्षी ८०० ते १००० या गटात असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ६०१ ते ८०० या गटात स्थान मिळवले. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ गेल्यावर्षी प्रमाणेच ८०१ ते १००० या गटात कायम राहिले. गेल्यावर्षी ६०१ ते ८०० या गटात असलेली मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे स्थान घसरून यंदा ८०१ ते १००० या गटात गेले. तर आयसर पुणे गेल्यावर्षीच्या ८०१ ते १००० या गटातून घसरून यंदा १००१ ते १२०० या गटात, मुंबई विद्यापीठ गेल्यावर्षीच्या १००० ते १२०० या गटातून घसरून यंदा १२०१ ते १५०० या गटात गेले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply