पुणे : माउलींच्या चंदेरी पालखी रथाला बैलजोडी साजिरी…; पालखी प्रस्थानापूर्वी रथ ओढण्याची चाचणी यशस्वी

पुणे : सावळ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी वारकऱ्यांच्या संगतीने पंढरीला प्रस्थान ठेवण्याचे वेध लागलेल्या पालखी सोहळ्याची अंतिम तयारी आता सुरू झाली आहे. यंदा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचा वैभवी चंदेरी रथ ओढण्याचा मान पांडुरंग वानखेडे यांच्या सोन्या-माउली या बैलजोडीला मिळाला आहे. या साजिऱ्या बैलजोडीला रथाला जुंपून रथ ओढण्याची चाचणी गुरुवारी (१६ जून) आळंदीत पूर्ण करण्यात आली. करोनातील निर्बंधांमुळे दोन वर्षांनंतर प्रथमच पालखी रथ पालखी मार्गावर येणार आहे.

रथाची चाचणी यशस्वी झाल्याचे सेवेचे मानकरी पांडुरंग वरखडे यांनी सांगितले. यंदा करोनातील दोन वर्षांच्या खंडानंतर पालखी सोहळा होणार असल्यास वारकरी-सेवेकऱ्यांमध्ये मोठा उत्साह आहे. यंदा पालखी सोहळ्यातील रथ ओढण्याचा मान आळंदीतील ग्रामस्थ असलेले पांडुरंग वरखडे, तानाजी वरखडे यांना परंपरेने मिळाला आहे. सोहळ्याच्या वैभावानुसार आणि चांदीच्या रथाच्या थाटाप्रमाणे त्यांनी बैलजोडी खरेदी केली आहे. ही बैलजोडी रथाला जुंपून तो ओढण्याची प्रत्यक्ष चाचणी घ्यावी लागते. त्यानुसार गुरुवारी आळंदी परिसरात ही चाचणी करण्यात आली.

आळंदी येथील माउली भक्त निवास ते केळगाव रस्ता आणि तेथून पुन्हा भक्त निवास या दरम्यान चाचणी आणि पाहणी करण्यात आली. त्याबाबत सेवेचे मानकरी वरखडे यांनी समाधान व्यक्त केले. रथाची देखभाल-दुरुस्ती करण्यात आली आहे. बैलजोडी जुंपून घेतलेली तपासणी समाधानकारक झाल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून माउलींच्या केवळ पादुकाच एसटी बसने पंढरपूरला नेल्या जात होत्या. त्यामुळे रथाचा वापर झाला नव्हता. त्यामुळे रथाची देखभाल-दुरुस्ती आळंदी देवस्थानच्या नियंत्रणात करण्यात आली आहे. श्रींचे सोहळ्यापूर्वी पुन्हा एकदा रथाला चकाकी देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक माउली वीर यांनी सांगितले.

माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी वापरण्यात येत असलेल्या चांदीच्या रथाचे वजन सुमारे दोन हजार किलो असल्याचे मानकरी पांडुरंग वरखडे यांनी सांगितले. बैलजोडी रथाला जोडून चालविण्यासह सोन्या-माउली या बैलजोडीने पालखी रथ चढ आणि उतारावर ओढण्याचा सरावही पूर्ण केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, घाटामधील अवघड वाटेवर किंवा पालखीच्या टप्प्यात विविध ठिकाणी अतिरिक्त बैलजोड्या रथाला जोडल्या जातात.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply