पुणे : मंदिरातील आरती कोणीही थांबवू शकत नाही, पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या सभेमुळे वातावरण चांगलंच तापलेलं आहे. मशिदीवरचे भोंगे हटवा अथवा आम्ही त्यासमोर हनुमान चालिसा लावू असा इशारा राज ठाकरेंनी आपल्या सभांमधून दिला होता. त्याचीच अंमलबजावणी व्हायला आज पहाटेपासूनच सुरूवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसही सतर्क झाले असून त्यांनी मनसैनिकांची घरपकड करण्यास सुरुवात केली आहे. याच संदर्भात पुणे पोलीस आय़ुक्तांनी आपली भूमिका मांडली आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, शहरात सकाळपासूनच दोन ते अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त आहे. परिस्थिती सामान्य असून अद्याप कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. मनसैनिकांवर केलेल्या कारवाईबद्दलही आय़ुक्तांनी भाष्य केलं असून मंदिरातली आरती कोणी थांबवू शकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, "ज्यांना नोटीस देण्याची गरज आहे, त्यांना नोटीस दिलेली आहे. कायदा व सुव्यवस्था नीट राहावी म्हणून ही कारवाई करण्यात आलेली आहे. सकाळची अजान लाऊडस्पीकरवर झालेली नाही. मंदिरातली आरती कोणीही थांबवू शकत नाही. पण ठरवून कोणी काही अनुचित प्रकार घडवू इच्छित असेल तर कारवाई नक्कीच केली जाईल. "

पुणे पोलिसांनी शहरात शांतता ठेवण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर पुणे पोलिसांनी ट्विटच्या माध्यमातून तरुणाईला एक प्रकारचं आवाहनही केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये पुणे पोलीस म्हणतात, "हे तरुणाई, तुझ्यासाठी..! पुण्यनगरी ही राजधानी असे सर्व शिक्षणाची संस्कृती शिकण्या येथे मांदीयाळी तरुणाईची नको आम्हा भोंगा, दंगा, पंगा अन जातीय तेढ सामाजिक सलोख्याची उभारु या मुहूर्तमेढ..! गुण्यागोविंदे नांदण्या, एकमेकां समजून घेऊ, अवघे धरू सुपंथ..!"



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply