पुणे : बनावट ‘एनए’ ऑर्डर, भोगवटापत्र तयार करून शेकडो सदनिकांची नोंदणी

पुणे : बनावट एनए ऑर्डर (बिगरशेती प्रमाणपत्र) आणि भोगवटापत्र तयार करून शेकडो सदनिकांची नोंदणी करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) बड्या अधिकाऱ्यांच्या नावाने ६७ बनावट ‘एनए ऑर्डर’, तर महापालिकेच्या नावावर ३७ बनावट भोगवटा पत्र अशा सुमारे शंभरहून अधिक केसेस तपासणीत आढळून आल्या आहेत. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता असून अशा प्रकारे बनावट कागदपत्रांचा वापर करून बेकायदा बांधकामातील सदनिकांची दस्तनोंदणी करून घेण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे. यूएलसीचे बनावट प्रमाणपत्र तयार करून बांधकाम परवानगी घेण्यात आल्याचे प्रकरण यापूर्वी २००४-५ मध्ये उघडकीस आले होते. या प्रकाराने बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. तर काही अधिकाऱ्यांना अटक देखील करण्यात आली होती. त्यानंतर बनावट स्टॅम्प पेपरचे प्रकरण उघडकीस आले. आता बनावट ‘एनए ऑर्डर’ व ‘भोगवटा प्रमाणपत्रा’चे प्रकरण उघडकीस आले. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे दाखल झालेल्या तक्रारी आणि त्या निमित्ताने करण्यात आलेल्या दफ्तर तपासणीतून हा सर्व प्रकार उघडकीस आला. बांधकामाला शिस्त लावण्यासाठी पाच वर्षांपूर्वी राज्य सरकारकडून रेरा कायदा लागू केला. रेराकडे नोंदणी केलेल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून बांधकाम परवानगी घेतलेल्या सदनिकांच्या दस्तांची नोंदणी सध्या केली जाते. अनधिकृत बांधकामातील सदनिकांची नोंदणी गेल्या वर्षापासून पूर्णपर्ण बंद करण्यात आली. उपनगराच्या भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली. अशा बांधकामातील दस्तांची नोंदणी बंद झाल्यामुळे काही हजार सदनिका पडून आहेत. हजारो नागरीक अडकून पडले आहेत. एवढेच नव्हे, अशा अनधिकृत बांधकामांमध्ये राजकीय क्षेत्रातील काही बड्यांचे पैसे अडकून पडले आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी या बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन सदनिकांची दस्तनोंदणी करून घेण्यात आल्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलिसांकडे देखील तक्रार नोंदविण्यात आली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. प्रशासकीय सेवेतील बड्या अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून या ऑर्डर तयार केल्यामुळे प्रशासकीय पातळीवरदेखील त्यांची गुप्तता पाळली जात आहे. दफ्तर तपासणीचे काम सुरू प्रामुख्याने पुणे शहरात अशा प्रकारे बनावट कागदपत्र सादर करून दस्तांची नोंदणी करण्यात आली. या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात दफ्तर तपासणीचे काम नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. पदावर नसलेल्यांची स्वाक्षरी गेल्या सहा महिन्यांत झालेल्या दस्तांना बनावट एनए ऑर्डर जोडण्यात आल्या. त्यापैकी काही ऑर्डरवर सेवानिवृत्त झालेले आयएएस अधिकारी, तर काहींवर सध्या प्रशासकीय सेवेत अतिवरिष्ठ पदावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. ऑर्डरवरील तारीख पाहिल्यानंतर त्या तारखेला हे अधिकारी त्याच पदावरच होते का, याची तपासणी केल्यानंतर त्यांनी या पदावर कधीच काम केले नसल्याचे दिसून आल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला. दोन प्रकारे बनाव
  • बनावट ‘एनए ऑर्डर’ - ६७
  • पालिकेच्या नावावर बनावट भोगवटा पत्र - ३७
बनावट एनए ऑर्डर आणि भोगवटापत्र बनवून दस्तनोंदणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशी जवळपास शंभर प्रकरणे आहेत. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अशी आणखी किती प्रकरणे झाली, त्यांची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. विनापरवाना अथवा बांधकाम न करता येणाऱ्या जागेवरील बांधकामांमधील सदनिकांची दस्तनोंदणी करून देतो, असे कोणी सांगत असेल, तर नागरिकांनी त्यास बळी पडू नये. - श्रावण हर्डीकर (नोंदणी महानिरीक्षक)


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply